Join us

"जीव गेला तरी बेहत्तर, आम्ही.."; NCP नेत्यांचा इशारा, सुप्रिया सुळेही संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 2:43 PM

हुतात्म्यांच्या बलिदानाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आहे. हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी दिला.

मुंबई - मुंबईच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने नीती आयोगावर सोपविली आहे. हे राज्यातील मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. केंद्र सरकार जे सांगते त्या पावलावरती पाऊल इथलं सरकार टाकत आहे. नीती आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार पंतप्रधान कार्यालयाच्या मार्फत मुंबई चालवणार का? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मांना अभिवादन करत हुतात्मा चौक येथे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नीती आयोगाच्या मार्फत मुंबईचा विकास हातात घेतला तर मुंबई पालिका आणि मुंबईतल्या आमदार खासदारांना काय अर्थ राहणार नाही. म्हणजे एक प्रकारे पंतप्रधान कार्यालय मुंबई चालवणार का? असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. मुळात राज्य सरकारसमोर नीती आयागाने मुंबईच्या विकासाबाबत जे सादरीकरण केले ते एका खासगी कंपनीने तयार करून दिले होते. या खासगी कंपनीने ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या MMRDA कडूनच मिळवली. म्हणजेच महाराष्ट्र सरकारकडूनच माहिती मिळवून ती पुन्हा महाराष्ट्र सरकारपुढेच सादर करण्यात आली. सरकारमधील कोणत्याच नेत्याला हे कसे कळले नाही. तसेच नीती आयोग जो काही विकासाचा आराखडा राबवणार त्याची गॅरंटी कोण घेणार? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही

मुंबईच्या विकास आराखड्याचे काम केंद्राच्या नीती आयोगाकडे सोपवणे म्हणजे महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. केंद्राचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही. मुंबईला महाराष्ट्रात ठेवण्यासाठी आम्ही पडेल ती किंमत देऊ. हुतात्म्यांच्या बलिदानाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आहे. हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी दिला.

हिमालायसमोर सह्याद्री कधीच झुकली नाही

हळुहळु महाराष्ट्राचे हृदय हिरावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सर्वात वेगाने वाढणारे शहर आहे. एक प्रगतीशील, सर्वात वैविध्यपूर्ण, मुंबई हे असे शहर आहे जिथे जात, पात, वर्ग, धर्म याची पर्वा न करता सर्वजण एकत्र राहतात. मात्र, ही ओळख पुसण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. आम्ही कोणत्याही स्थितीत मुंबई महाराष्ट्रापासून तुटू देणार नाही. महाराष्ट्रापासून ती सुटू देणार नाही. हिमालायसमोर सह्याद्री कधीच झुकली नाही. सह्याद्री हा हिमालयाच्या मदतीला जातो. हे आश्चर्यकारक आहे की मुंबईकरांना नाही तर महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला जाग आली आहे. हा वेगळा विषारी डाव केंद्रातील सत्ता टाकते आणि महाराष्ट्र सरकार ही केंद्राच्या निर्णयाला नतमस्क होतय. हे आम्हाला चालणार नाही. मुंबई कुठल्यालही परिस्थितीत माझ्यासारख्याचा जीव गेला तरी बेहत्तर. पण आम्हाला हुताम्यांनी दिलेली आमची मुंबई आम्ही सुरक्षित ठेवू. आमच्या मिठीतून मुंबई आम्ही बाहेर जाऊ देणार नाही असं आमदार जितेंद आव्हाड यांनी म्हटलं.

टॅग्स :सुप्रिया सुळेमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसजयंत पाटील