चिपळूण : कोकण हा तहानलेला आहे. त्यामुळे प्राधान्याने कोकणाला पाणी मिळालेच पाहिजे. येथील लोकांची तहान भागल्याशिवाय मुंबईला पाणी कदापि नेऊ देणार नाही. कोकणचे पाणी मुंबईला नेणे हा एक प्रकारे कोकणावर अन्याय आहे, असे मत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाले. मात्र या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हेतूपुरस्सर डावलण्यात आले. योग्यवेळी भाजपच्या भूमिकेबद्दल ठाकरे हे योग्यवेळी निर्णय घेतील, असेही कदम म्हणाले. दुष्काळग्रस्त एक हजार शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी मदतीचा हात दिला आहे. शिवसेना व भाजप युती तुटलेली नाही. दिशाभूल करणाऱ्या बातम्या येत आहेत. मात्र, भाजपच्या भूमिकेबाबत उद्धव ठाकरे योग्यवेळी बोलतीलच, असे कदम म्हणाले. कोकणात सिंचनाचे काम योग्य पद्धतीने झालेले नाही. असे असताना येथील कोयनेचे पाणी मुंबईला नेण्याचा घाट रचला जात आहे. तो कदापिही यशस्वी होऊ देणार नाही, असेही कदम यांनी सांगितले. (वार्ताहर)
कोयनेचे पाणी मुंबईला मिळणार नाही : कदम
By admin | Published: October 13, 2015 10:53 PM