मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात वीज वाहून आणणाऱ्या वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आतापर्यंत किमान दोन ते तीन वेळा मुंबई अंधारात गेली होती. मात्र, या घटनांतून वीज कंपन्यांनी धडा घेतला असून आता मुंबई आयआयटीच्या मदतीने लोडशेडिंग आणि प्रोटेक्शन स्कीमचा अभ्यास करत फ्रीक्वेन्सी सेटिंग करण्यात आली आहे. त्यामुळे वीज वाहिन्यांत बिघाड झाला तरी टप्प्याटप्प्याने लोडशेडिंग करण्यात येईल. परिणामी, मुंबई पूर्ण अंधारात जाणार नाही, असा दावा वीज कंपन्यांनी केला आहे.
टाटा पॉवरच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, मुंबई पुन्हा अंधारात जाऊ नये म्हणून पहिल्यांदा वीज कंपन्यांत योग्य समन्वय साधला जात आहे. दुसरे म्हणजे लोडशेडिंग स्कीम आणि प्रोटेक्शन स्कीम याचा पुन्हा एकदा अभ्यास करण्यात आला आहे. आयआयटीची यासाठी मदत घेण्यात आली आहे. आता स्कीमची अंमलबजावणी करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे फ्रीक्वेन्सी सेटिंग व्यवस्थित करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात समजा एखादी अशी घटना घडली तर लोडशेडिंग नीटनेटके करता येईल आणि मुंबईला ब्लॅक आऊट होण्यापासून वाचविता येईल. शिवाय कमी वेळेत वीजपुरवठा पूर्ववत करता येईल.
मुंबईत बुडाली होती अंधारात
- मागील वेळी पडघ्याला एका वाहिनीत बिघाड झाला. दुसरी वाहिनी ट्रिप झाली. त्यामुळे जनरेटरवर भार वाढला. त्यातच लोडशेडिंगचे वेळेत व्यवस्थापन झाले नाही.
- परिणामी, फ्रीक्वेन्सी कमी झाली आणि जनरेटर पूर्णत: ट्रिप झाले. म्हणून मुंबई अंधारात गेली होती.
- उन्हाळ्यात वीज कमी पडणार नाही
- ऐन उन्हाळ्यात मुंबई शहर आणि उपनगरात विजेची मागणी वाढते. सध्या विजेची मागणी ४ हजार मेगावॅटच्या आसपास असून, उन्हाळ्यामुळे विजेची उपकरणे वेगाने आणि २४ तास सुरू असल्याने विजेची सर्वाधिक मागणी नोंदविली जाते.
- अशावेळी मुंबईला ६०० मेगावॅट अतिरिक्त वीज मिळावी म्हणून वीज वाहिन्यांचे काम करण्यात आले आहे, असेही टाटा पॉवरकडून सांगण्यात आले.