पुन्हा एकदा मुंबई जिंकतेय; कोरोना हरतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:05 AM2021-04-27T04:05:47+5:302021-04-27T04:05:47+5:30
त्रिसूत्री पाळा, संसर्गाला दूर ठेवा; महापालिकेचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या ‘ब्रेक द चेन’साठी सर्वच स्तरावर प्रयत्न ...
त्रिसूत्री पाळा, संसर्गाला दूर ठेवा; महापालिकेचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या ‘ब्रेक द चेन’साठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मुंबईसारख्या महानगरात सोशल डिस्टन्स पाळणे अवघड असले तरी कठोर निर्बंधांद्वारे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला काही प्रमाणात यश मिळत असून, एप्रिलच्या सुरुवातीला ११ हजारांवर असलेली मुंबईची दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या आता निम्म्यावर आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या साडेपाच हजारांवर आली आहे. सहकार्य मिळाले तर हाच ट्रेंड कायम राहील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
आपण सर्वजण गेले वर्षभर कोरोना विरोधातील लढाई लढत आहोत. दोन महिन्यापासून आपल्या मदतीला लसही आली. त्यानंतर मुंबईकरांचा निष्काळजीपणा काहीसा वाढला आणि त्याचे दुष्परिणाम गेल्या दीड ते दाेन महिन्यांत दैनंदिन काेराेना रुग्णवाढीच्या रुपात पहायला मिळाले. रुग्णसंख्या पूर्वीपेक्षा तिप्पट झाली होती. मात्र आता हा आलेख पुन्हा खाली येत आहे. राज्य सरकारच्या मदतीने मुंबई महापालिका या संकटाला सामोरे जाण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. परंतु यात मुंबईकर नागरिकांचे पूर्वीप्रमाणे सक्रिय सहकार्य मिळाले, तरच या संकटावर पुन्हा नियंत्रण आणणे शक्य आहे. जास्तीत जास्त स्वयंशिस्तीची गरज आहे आणि मुंबईकर यात कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.
* चाचणी, विलगीकरण, त्वरित उपचारांवर भर
- १० फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. असे असले तरी दैनंदिन रुग्णांमध्ये सुमारे ८५ टक्के हे लक्षणविरहित रुग्ण आहेत.
- मागील वर्षभरात ४१ लाख ७४ हजार २५९ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. तपासणी, चाचणी, विलगीकरण, त्वरित उपचारांवर भर देण्यात आला.
- ५३ लाख ५२ हजार ५२१ बाधितांचे विलगीकरण करण्यात आले.
- महापालिकेने दररोज १ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले.
- आतापर्यंत १२ लाख ६० हजार ३८७ हून अधिक नागरिकांचे लसीकरण केले.
- २ वेळा सुमारे ३५ लाख मुंबईकर नागरिकांच्या कुटुंबाच्या घरी जाऊन तपासणीसह कोराेना विरोधातील लढाईबाबत जागृती आणि माहिती गोळा करण्यात आली.
* त्रिसूत्रीचे पालन गरजेचे
१) मुखपट्टी / मुखावरण अर्थात मास्कचा कटाक्षाने नियमितपणे वापर करावा.
२) नागरिकांनी आपापसात किमान २ मीटरचे सुरक्षित अंतर ठेवावे.
३) वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावेत तसेच निर्जंतुकीकरण द्रव्याचा अर्थात सॅनिटायझरचा योग्यरित्या वापर करावा.
काेराेनाला हरवण्यासाठी या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन मुंबई पालिकेकडून सातत्याने केले जात आहे.
* अशी झाली काेराेनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये घट
मुंबई महापालिका कोरोना रुग्णांचा चढता आलेख कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यानुसार, विविध उपाययोजना हाती घेतल्या असून त्याला यश मिळत आहे. काेराेनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत हळूहळू घट हाेत आहे.
दिनांक - रुग्ण ( महिना : एप्रिल )
१ - ८ हजार ६४६
२ - ८ हजार ८३२
३ - ९ हजार ९०
४ - ११ हजार १६३
५ - ९ हजार ८५७
६ - १० हजार ३०
७ - १० हजार ४२८
८ - ८ हजार ९३८
९ - ९ हजार २००
१० - ९ हजार ३२७
११ - ९ हजार
१२ - ६ हजार ९०५
१३ - ७ हजार ८९८
१४ - ९ हजार ९२५
१५ - ८ हजार २१७
१६ - ८ हजार ८३९
१७ - ८ हजार ८३४
१८ - ८ हजार ४००
१९ - ७ हजार ३८१
२० - ७ हजार २१४
२१ - ७ हजार ६८४
२२ - ७ हजार ४१०
२३ - ७ हजार २२१
२४ - ५ हजार ८८८
२५ - ५ हजार ५४२
उपाय योजनांमुळे मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक कमी होत असून, मुंबईकरांनी नियम पाळले तर कोरोनाचे समूळ उच्चाटन करणे शक्य हाेईल, असा विश्वास मुंबई महापालिकेने व्यक्त केला आहे.
............................