धुळे : म्हसदी येथील रहिवासी व मुंबई येथे डॉक्टर असलेल्या महिलेला घरात घुसून मारहाण करीत तिची ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत धिंड काढण्यात आल्याची घटना उघड झाली. या प्रकरणी महिला डॉक्टरने साक्री पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर ११ रोजी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, नवी मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेली महिला डॉक्टर आपल्या डॉक्टर पतीसह म्हसदी येथे विवाह सोहळ्यासाठी आल्या होत्या. बुधवार ११ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास हे डॉक्टर दाम्पत्य घरात असताना गावातील काही महिलांनी मागील भांडणाच्या कारणावरून घरात घुसून दोघांना मारहाण केली. डॉक्टर महिलेला मारहाण सुरू असताना तिला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. नंतर त्या महिला आणि सोबत आलेल्या पुरुषांनी महिला डॉक्टरला मारहाण करीत थेट ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत नेले. यावेळीे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित गावातील ग्रामस्थांनी मध्यस्थी करून त्या महिला डॉक्टरला सोडविले. दरम्यान ही घटना पोलीस स्टेशनला कळविण्यात आल्याने साक्रीचे पोलीस गाडी घेऊन तेथे पोहोचले व सदर जखमी महिलेला व त्यांच्या पतीला पोलीस गाडीत बसून साक्रीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले आहेत.नंतर महिला डॉक्टर यांनी साक्री पोलीस स्टेशनला जाऊन यासंदर्भात फिर्याद देताना मारहाण करणाऱ्या लोकांसोबतच या घटनेस कारणीभूत असलेल्या म्हसदी बीट येथील दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. याप्रकरणी सतीश आत्माराम देवरे, उज्ज्वला सतीश देवरे, वर्षा नरेंद्र देवरे, नरेंद्र आत्माराम देवरे, नानाजी यादव पवार, निर्मला यादव पवार, संगीता यादव पवार, सुनीता यादव पवार, आशाबाई शालीग्राम पवार, अजय नानाजी पवार, रवींद्र नानाजी पवार, लक्ष्मण माळचे यांच्याविरोधात भादंवि कलम ३९५, ३५४, ३२३, ४५२, १४३, १४७, १४९, ३२४, २९४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबईच्या महिला डॉक्टरला म्हसदी येथे मारहाण, धिंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 5:44 AM