मुंबई -
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. अशातच एक धक्कादायक घटना घडली आहे. समुद्रात वाकून पाहत असताना एक महिला तोल जाऊन समुद्रात पडल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. महिला समुद्रात पडल्यानंतर एका फोटोग्राफरने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता महिलेचा जीव वाचवला आहे. महिलेचा जीव वाचवलेल्या व्यक्तीचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला गेट वे ऑफ इंडिया येथील सुरक्षा भिंतींवर (कट्ट्यावर) बसली होती. याच दरम्यान अचानक महिलेचा तोल गेला आणि ती महिला समुद्रात पडली. यानंतर लगेचच याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे फोटो काढणाऱ्या एका 50 वर्षीय फोटोग्राफरने समुद्रात उडी घेत या महिलेचा जीव वाचवला. ही घटना सोमवारी घडली असून घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. फोटोग्राफरच्या या धाडसाचं आणि त्यांनी केलेल्या या मदतीचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे.
गुलाबचंद गोंड असं या फोटोग्राफरचं नाव आहे. या व्यक्तीने महिलेला वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली. आसपास असणाऱ्या पर्यटकांनी आणि पोलिसांनी त्यांना वरती खेचण्यासाठी पाण्यात दोर टाकला. महिलेला वाचवण्यासाठी ट्यूब टाकण्यात आली. याच्याच मदतीने महिलेला वर काढण्यात आलं. महिला 20 फूट खोल पाण्यात पडल्याने बचावकार्यासाठी थोडा वेळ लागला. मात्र महिलेचा जीव वाचवण्यात यश आले आहे. पाण्यातून बाहेर आल्यावर महिलेने आपल्याला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.