मुंबई - सूरतहूनमुंबईकडे येणाऱ्या भूज-दादर एक्स्प्रेसमध्ये एका 40 वर्षीय महिलेची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. थरकाप उडवणारी ही घटना महिलांच्या डब्यात घडली आहे. आरपीएफचे जवान गाडी चेक करत असताना त्यांना रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह आढळला. मृत महिलेचं नाव दाडिया देवी शंकर चौधरी असे आहे. दाडिया देवी यांच्या गळ्यावर, दोन्ही हातावर आणि छातीवर शस्त्रानं वार करण्यात आलेल्या गंभीर जखमी आढळून आल्या आहेत.
याप्रकरणी मुंबई सेंट्रल जीआरपीएफनं हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. लुटमारीच्या उद्देशानं दाडिया देवी यांची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाडिया देवी या सूरतमधील रहिवासी होत्या. त्या वडाळ्यातल्या आपल्या बहिणीकडे जात होती. दाडिया देवी या एका कपड्याच्या दुकानात काम करायच्या. दोन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे, शैलेंद्र यांनी सांगितलं आहे.
सूरत इथून त्या ट्रेनमध्ये चढल्या आणि शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ज्या ट्रेनमध्ये दाडिया देवींचा मृतदेह आढळून आला ती ट्रेन सूरतनंतर थेट वसई, बोरीवली आणि दादरला थांबते. याच दरम्यान, रेल्वेतून काही महिला उतरताना दिसत आहे. जर त्या महिलांनी मृतदेह पाहिला तर त्यांनी याबद्दल पोलिसांना का नाही सांगितलं?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस आता या दिशेनेही तपास करत आहेत. दरम्यान, जीआरपीएफ सर्व स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत आहेत.