मुंबई : मुंबईतील ५२ वर्षीय महिलेवर गोल्ड इम्प्लांट्स शस्त्रक्रियेच्या साहाय्याने गुडघा प्रत्यारोपण यशस्वीरीत्या करण्यात आले. रुग्ण आॅटोइम्युन संधिवाताने ग्रस्त होती. त्यात तिचे वजन अधिक असल्यामुळे तिला गुडघेदुखीचा त्रास होता. ती आधाराशिवाय चालू शकत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी गोल्ड ट्रान्सप्लांटचा पर्याय निवडला.मुंबईत राहणाऱ्या ५२ वर्षांच्या गृहिणी रोहिणी (नाव बदललेले) यांना सहा वर्षांपूर्वी आॅटोइम्युन आर्थरायटिसचा त्रास सुरू झाला. संधिवाताच्या काही प्रकारांमध्ये रुग्णाची रोगप्रतिकार यंत्रणा स्वत:वरच हल्ला चढवू लागते. ºहुमॅटॉइड संधिवात हे याचे सर्वाधिक आढळणारे उदाहरण आहे. रुग्णाचे वजनही प्रमाणाहून अधिक वाढते.गेल्या वर्षीपासून त्यांना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला. मागील चार महिन्यांपासून त्या घराबाहेरही पडल्या नव्हत्या, त्यांना चालण्यासाठी आधार लागत होता. दैनंदिन कामे करणेही कठीण झाले होते. याविषयी डॉ. कुणाल माखिजा यांनी सांगितले की, रुग्णाच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना होत होत्या. पाय वाकलेले होते. त्यांना नीट चालता येत नव्हते. एक्स-रेमध्ये प्रगत स्वरूपातील आॅस्टिओआर्थरायटिस आढळून आला. रुग्णाची सखोल तपासणी करून गोल्ड इम्प्लांट्ससह दोन्ही गुडघ्यांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून त्यांची समस्या दूर करण्यात आली.रुग्णाची शस्त्रक्रिया २५ फेब्रुवारीला करण्याचे ठरले. सायमल्टेनियस बायलॅटरल रिप्लेसमेंटमध्ये रुग्णाच्या दोन्ही गुडघ्यांच्या जागी कृत्रिम गुडघे (प्रोस्थेसिस) एकाच शस्त्रक्रियेद्वारे बसविले जातात. प्रोस्थेसिस हे क्रोमियम, कोबाल्ट आणि टिटॅनियम आदी धातूंपासून घडविलेले असते. या रुग्णाची परिस्थिती गोल्ड इम्प्लांट्स वापरण्यासाठी आदर्श होती. तुलनेने कमी वयाच्या रुग्णांमध्ये असे इम्प्लांट्स वापरले जातात. ज्यांना गुडघे सामान्य पद्धतीने वाकविण्याची इच्छा असते, त्यांच्यासाठीही अशा पद्धतीचे प्रत्यारोपण उपयुक्त ठरते, असे डॉ. माखिजा यांनी स्पष्ट केले.>शस्त्रक्रियेनंतर त्याच दिवशी चालणे शक्यया गुडघे प्रत्यारोपणामध्ये टिटॅनियम निओबियम नायट्राइडचे (टीनिन) पृष्ठभागावरील आवरण अधिक चांगले असते. या आवरणामुळे इम्प्लांटला सोनेरी रंग येतो आणि गुडघा प्रत्यारोपण दीर्घकाळ प्रभावी ठरते, तसेच धातूची अॅलर्जी होत नाही. हे इम्प्लांट्स झिजण्याची, तसेच तुटण्याची शक्यता खूप कमी असते आणि याची अॅलर्जीही होत नाही, असे डॉ. माखिजा यांनी सांगितले. शस्त्रक्रिया साडेतीन तास चालली. शस्त्रक्रियेनंतर त्याच दिवशी रुग्ण स्त्री चालायलाही लागली.
शस्त्रक्रियेद्वारे मुंबईकर महिलेला मिळाले ‘सुवर्ण गुडघे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 11:51 PM