मुंबई : एमबीबीएस झालेल्या २९ वर्षीय डॉ. निताशा बंगाली हिने भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आयुष्य संपविल्याची घटना गुरुवारी वरळीत घडली. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होणार की नाही, या तणावात तिने हे टाेकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज असून, पाेलीस अधिक तपास करत आहेत.वरळीतील समुद्र दर्शन इमारतीत निताशा ही आई-वडील व भावासोबत राहत होती. तिचे आई, भाऊ, मावशी डॉक्टर आहेत तर वडील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. निताशा केईएममध्ये पदव्युत्तरच्या तृतीय वर्षाला होती. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता ती रुग्णालयातून घरी परतली. त्यानंतर तिने भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेतला. संध्याकाळी आई घरी आली तेव्हा निताशा बेशुद्धावस्थेत हाेती. तिला तत्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे निदान डाॅक्टरांनी केले.गेल्या काही महिन्यांपासून तृतीय वर्षात उत्तीर्ण हाेणार की नाही? नापास झाले तर मित्र-मैत्रिणींना, कुटुंबाला कसे तोंड देणार, अशा अनेक विचारांमुळे ती मानसिक तणावात होती. याच तणावातून आत्महत्येचा विचार येत असल्याचे तिने आईला सांगितले हाेते. त्यावेळी आईने तिची समजूतही काढली हाेती. या आत्महत्येप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी सांगितले.
अभ्यासाच्या तणावातून इंजेक्शन घेऊन डाॅक्टर तरुणीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 7:25 AM