मुंबईतील युवावर्ग भाजपाच्या सोबत - मोहित कंबोज

By Admin | Published: January 14, 2017 07:18 AM2017-01-14T07:18:44+5:302017-01-14T07:18:44+5:30

मुंबईतील युवावर्ग मोठ्या प्रमाणात भाजपाच्या बरोबर असून आगामी पालिका निवडणुकीत तो भाजपाला एकहाती सत्ता मिळवून

Mumbai youth with BJP - Mohit Kamboj | मुंबईतील युवावर्ग भाजपाच्या सोबत - मोहित कंबोज

मुंबईतील युवावर्ग भाजपाच्या सोबत - मोहित कंबोज

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर / मुंबई
मुंबईतील युवावर्ग मोठ्या प्रमाणात भाजपाच्या बरोबर असून आगामी पालिका निवडणुकीत तो भाजपाला एकहाती सत्ता मिळवून देण्यास मोठी भूमिका बजावेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष मोहित कंबोज यांनी ‘लोकमत व्यासपीठ’मध्ये बोलताना व्यक्त केले. कंबोज यांची नुकतीच भाजपाने मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
निवडीनंतर त्यांनी मुंबईत अनेक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. अनेकविध उपक्रमांमुळे अनेक तरुण भाजयुमोसोबत जोडले जात आहेत. दक्षिण मध्य मुंबईतील एलफिन्स्टन येथील कामगार क्रीडा मैदानात आयोजित युवा ऊर्जा मेळाव्याला २५ हजार तरुणांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आयोजित कॅशलेस इंडिया उपक्रमाला आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. ‘लोकमत व्यासपीठ’ अंतर्गत कंबोज यांनी भाजयुमोची आगामी पालिका निवडणुकीतील रणनीतीसह विविध विषयांवरील भूमिका मनमोकळेपणे मांडली.
ते म्हणाले, आगामी पालिका निवडणुकीत भाजयुमोच्या माध्यमातून तरुण नेतृत्व निर्माण होणार आहे. देशात ३५ टक्के तरुणाई ही ३५ वर्षांखालील वयोगटातील आहे. त्यामुळे मुंबईतील तरुणाईच्या भविष्याचा विचार करून भाजयुमोने अनेक योजना आखल्या आहेत. रोजगारासह जॉब पोर्टलची निर्मिती, कौशल्यविकास प्रशिक्षण, क्रीडा प्रशिक्षण, शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश उपलब्धता, ड्रग फ्री मुंबई, तरुणाईसाठी काउन्सिलिंग केंद्र, नवीन उद्योगधंद्याची निर्मिती असे अनेक विधायक उपक्रम भाजयुमो राबविणार आहे. मुंबईतील तरुणांना उद्योगधंदे उभारण्यासाठी अनेक सरकारी योजनांचे स्टॉल्स मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत. तसेच पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत त्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्टदेखील तयार करण्यासाठी भाजयुमो मदत करणार आहे. स्किल इंडिया, बेटी बचाव बेटी बढाव अशा व अन्य समाजाभिमुख उपक्रमांतही पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले.
भाजपा-सेना युतीबाबत ते म्हणाले, आमचे वरिष्ठ युतीचा निर्णय घेतील. मात्र स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढवल्यामुळेच आमचे १२३ आमदार राज्यात आणि १५ आमदार मुंबईत निवडून आले. तर मुंबईतील पाच उमेदवार पाच हजारांपेक्षा कमी मतांनी पराभूत झाले होते. गेल्या दोन वर्षांत चित्र बदलले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून महापालिकेत भाजपाचा महापौर आरूढ होईल, असा विश्वासही कंबोज यांनी व्यक्त केला. खड्डेमय रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, डम्पिंग ग्राउंड, पालिकेतील भ्रष्टाचार, वाहतूककोंडी, विकासाच्या कामात येणारी अनधिकृत बांधकामे, प्रदूषण, झोपडपट्टीचा पुनर्विकास, सामान्य मुंबईकरांना अल्प दरात परवडणारी घरे, शौचालयांची कमतरता, दर्जेदार शाळा आणि महाविद्यालयांची अनुपलब्धता या मुंबईकरांना भेडसावणाऱ्या विविध दैनंदिन समस्या सोडवून पालिकेतील कारभार स्वच्छ आणि पारदर्शी करण्याचा भाजपाचा अजेंडा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. सध्या मुंबईकरांना भेडसावणाऱ्या वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी आणि मुंबईतील नागरिक कमी वेळात आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी मुंबईत कोस्टल रोडची निर्मिती, मेट्रो आणि मोनोरेलचे जाळे उभारून ‘ट्रॅफिक जाम फ्री’ मुंबई करण्यास मुख्यमंत्री सातत्याने प्रयत्नशील असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: Mumbai youth with BJP - Mohit Kamboj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.