मुंबई - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य होतं. मुंबईकर तरुणाने हे सिद्ध करून दाखवलं आहे. अब्दुल्ला खान असं या 21 वर्षीय तरुणाचं नाव असून गुगलने त्याला मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर दिली आहे. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या अब्दुल्ला याला गुगलने 1 कोटी 20 लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी दिली आहे.
अब्दुल्ला खान याने मीरा रोड येथील श्री एल. आर. तिवारी इंजिनीअरिंग कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. गुगलने काही काही दिवसांपूर्वी प्रोग्रॅमिंग साइटवर त्याचं 'प्रोफाइल' पाहिलं आणि मुलाखतीसाठी त्याला बोलावून घेतलं होतं. अब्दुल्लाने कम्प्युटर सायन्समधून इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. ऑनलाईन मुलाखतीचे काही टप्पे पार करत त्याने मुलाखतीचा शेवटचा टप्पा गाठला. गुगलच्या लंडन येथील कार्यालयात त्याची अंतिम मुलाखत घेण्यात आली. त्यामध्ये अब्दुल्ला उत्तीर्ण झाल्यामुळे गुगलने त्याला वार्षिक 1.2 कोटी रुपये वेतन दिले आहे. सप्टेंबरमध्ये तो कामावर रुजू होणार असून लंडनच्या कार्यालयात काम करणार आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गुगलच्या अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या मेलनुसार, प्रोग्रॅमिंग साइटवर त्यांनी अब्दुल्लाचं प्रोफाइल पाहिलं होतं. त्याचवेळी गुगलला युरोपमधील अनेक ठिकाणांसाठी मनुष्यबळाची गरज होती. गुगलकडून मोठ्या पगाराची नोकरी मिळाल्याने अब्दुल्ला आणि त्याच्या कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे. सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. 'गुगलकडून इतक्या मोठ्या पगाराची नोकरी मिळेल असं वाटलं नव्हतं. मनात आलं म्हणून गुगलच्या साइटवर नोकरीसाठी अर्ज केला होता. या साइटवर उमेदवारांचं प्रोफाइल पाहिलं जातं हे सुद्धा मला ठाऊक नव्हतं. आता गुगलमध्ये काम करण्यास प्रचंड उत्सुक आहे. मला खूप काही शिकायला मिळणार आहे. माझ्यासाठी एक मोठा अनुभव असणार आहे,' असं अब्दुल्लाने म्हटलं आहे.
मराठमोळ्या 22 वर्षीय आदित्यला गुगलची ऑफर, भला मोठ्ठा पगार
मुंबईतील 22 वर्षीय तरुणाला गुगलकडून याआधी नोकरी देण्यात आली होती. आदित्य पालिवाल असे या तरुणाचे नाव असून त्यास 1.2 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले होते. आदित्यने बंगळुरू येथील इंटरनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी येथून आपली इंजिनीअरींगची पदवी घेतली आहे. मुंबईचा मराठमोळा आदित्य आता न्यूयॉर्क येथील गुगलच्या कार्यालयात आर्टिफिशल इंटेलिजेंस रिसर्च विभागात काम करत आहे.
जगभरातील 6 हजार लोकांमधून 50 जणांची निवड केली. त्यामध्ये आदित्यचा नंबर लागला होता. आदित्यने इंटरनॅशनल कॉलेजिएट प्रोग्रामिंग कन्टेस्ट (ICPC) 2017-18 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. कम्प्युटर लँग्वेजसंदर्भातील ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत 111 देशांमधील 3098 विद्यापीठातून 50 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. गुगलने दिलेल्या नोकरीबाबत बोलताना, मला ही ऑफर मार्च महिन्यातच मिळाली आहे. याची मी खूप वाट पाहात होतो. सध्या मी अतिशय खूप असून गुगलमध्ये मला अनेक नव्या बाबी शिकायला मिळणार आहेत, असे आदित्यने म्हटले होते.