मुंबईकरांनो, खडतर प्रवासासाठी तयार राहा ! खोदकामांसाठी सहा हजार अर्ज, ठिकठिकाणी चर खोदले जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 04:05 AM2017-10-08T04:05:12+5:302017-10-08T04:05:25+5:30
मेट्रो-मोनो रेल्वेच्या खोदकामाने वाहतूककोंडीचा सामना करणा-या मुंबईकरांच्या अडचणी पुढच्या वर्षभरात आणखी वाढणार आहेत. मुंबईत विविध सेवा पुरविणा-या उपयोगिता कंपन्यांकडून चर खणण्याचे तब्बल सहा हजार अर्ज मुंबई महापालिकेकडे आले आहेत.
मुंबई : मेट्रो-मोनो रेल्वेच्या खोदकामाने वाहतूककोंडीचा सामना करणा-या मुंबईकरांच्या अडचणी पुढच्या वर्षभरात आणखी वाढणार आहेत. मुंबईत विविध सेवा पुरविणा-या उपयोगिता कंपन्यांकडून चर खणण्याचे तब्बल सहा हजार अर्ज मुंबई महापालिकेकडे आले आहेत. वारंवार होणा-या या खोदकामांनी रस्तेही खड्ड्यात जात असल्याने दुसºयांदा चर खोदण्याची परवानगी मागणाºया कंपन्यांना थेट पालिका आयुक्तांकडूनच मंजुरी घ्यावी लागणार आहे.
टेलिफोन, वीजपुरवठा यांसारख्या विविध कंपन्या केबल टाकण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी रस्त्यांवर चर खोदत असतात. दरवर्षी सरासरी ४०० कि.मी.पेक्षा अधिक रस्ते अशा कामांसाठी खणले जातात. मात्र या कंपन्या काम झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करताना कोणतीच खबरदारी घेत नाहीत. त्यामुळे रस्ते असमतोल होऊन खड्ड्यात जातात. अशा वेळी वाहतूककोंडी तसेच वाहनचालकांचे व पादचाºयांचे हाल होतात. मात्र या खोदकामांना शिस्त लावण्याच्या पालिकेच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही.
त्यामुळे रस्त्यांवर चर खोदण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी ही प्रक्रिया या वर्षीपासून आॅनलाइन करण्यात आली आहे. यानुसार वर्ष संपण्याआधीच आतापर्यंत सहा हजार अर्ज आॅनलाइन पद्धतीने महापालिकेकडे आले आहेत. मात्र रस्त्यांवर पुन्हा पुन्हा चर खोदले जाणार नाहीत, याची काळजी घेण्याची ताकीद पालिका आयुक्त अजय मेहता यांनी अधिकाºयांना दिली आहे.
परवानगीचा निर्णय आयुक्त घेणार
चर खोदण्यासाठी सॉफ्टवेअर आधारित परवानगी देताना रस्त्यावरील एखाद्या भागासाठी पहिल्यांदा चर खोदण्याची परवानगी ही विभाग स्तरावर देण्यात येणार आहे. तर
त्याच ठिकाणी दुसºयांदा चर खोदण्याची परवानगी मागणारा
विनंती अर्ज आल्यास त्याबाबतची परवानगी ही केवळ महापालिका आयुक्तांच्या स्तरावर दिली जाणार आहे.
चर खोदण्याचे प्रमाण घटणार
चर खोदण्याच्या परवानगीसाठी आॅनलाइन अर्ज पद्धती व सॉफ्टवेअर सुरू झाल्यामुळे विविध उपयोगितांच्या कामांसाठी चर खोदण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असा पालिकेचा दावा आहे.
संस्था अनेक,
परवानगी एक!
पालिकेने तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संगणकीय सॉफ्टवेअर आॅनलाइन पद्धतीने प्राप्त झालेल्या सहा हजार अर्जांची छाननी सॉफ्टवेअरद्वारेच करण्यात येणार आहे.
एखाद्या रस्त्यासाठी एकापेक्षा अधिक कंपन्यांचे अर्ज असल्यास त्या रस्त्यावर सर्व कंपन्यांना मिळून एकाच कालावधीसाठी व एकच परवानगी दिली जाणार आहे.
या परवानगीचा कालावधी तपशीलवार माहिती अन्य उपयोगिता देणाºया कंपन्यांनादेखील सॉफ्टवेअरच्या मदतीने पाठविली जाणार आहे.
या कालावधीतच इतर कंपन्यांना त्यांचे त्या ठिकाणचे काही काम असल्यास ते करू शकतील. यामुळे एका ठिकाणी एकदाच चर खोदून उपयोगितांची कामे करणे शक्य होणार आहे.
मुंबईला दिशा मिळणार
मुंबईतील सर्व रस्त्यांवर दिशादर्शक फलक प्राधान्याने लावावेत. त्याचबरोबर सर्व फलकांवर महापालिकेचे बोधचिन्ह ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने असावे, अशी ताकीद पालिका आयुक्तांनी सर्व विभागस्तरीय सहायक आयुक्तांना आज दिली. महापालिकेच्या रस्ते व वाहतूक खात्याद्वारे दिशादर्शक फलक लावले जातात. मात्र स्थानिक पातळीवर कोणत्या ठिकाणी फलक लावण्याची आवश्यकता आहे? याची माहिती विभागाकडे असते. त्यामुळे पहिल्यांदाच दिशादर्शक फलक लावण्याची कार्यवाही ही विभाग स्तरावर केली जाणार आहे.