मुंबईकरांनो, टंचाईचा सामना करण्यापेक्षा पाणी जपून वापरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 01:56 AM2019-05-03T01:56:08+5:302019-05-03T06:22:15+5:30
राज्यभरामध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये पाण्याची भीषण पाणीटंचाई सुरू आहे. कित्येक खेड्यापाड्यांतील विहिरी आटून जात असल्याने उन्हातून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
सागर नेवरेकर
मुंबई : राज्यभरामध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये पाण्याची भीषण पाणीटंचाई सुरू आहे. कित्येक खेड्यापाड्यांतील विहिरी आटून जात असल्याने उन्हातून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे बऱ्याच नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी, मुंबईकरांना पाण्याची झळ बसू नये म्हणून आता मुंबईमधील हॉटेल्समध्ये मुंबई ग्राहक पंचायत व आहार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘पाणी माझी जबाबदारी - ग्राहक जागरण अभियान’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. हॉटेलमध्ये ग्राहकांनी गरजेपुरतेच पाणी घ्यावे, असा संदेश देणारे बोलके चित्र हॉटेलच्या दर्शनी भागावर लावण्यात आले आहे.
मुंबई ग्राहक पंचायतीच्या (दादर, माहिम, वांद्रे) विभागाच्या सचिव रंजना मंत्री यांनी सांगितले की, आहार संस्थेच्या माध्यमातून हॉटेल्समध्ये पाणी बचतीची मोहीम राबविली जात आहे. हॉटेल्समध्ये आकर्षक पोस्टर लावून पाण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
बोलकी चित्रे जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या विद्यार्थ्यांनी ग्राफिक डिझाइन्सद्वारे साकारली. दादर पूर्व-पश्चिम, सायन या झोनमध्ये आठ हजार सदस्यांमार्फत ही बोलकी चित्रे हॉटेलमध्ये लावण्यात आली आहेत. पाणी फुकट मिळते मग ते कसेही वापरायचे, ही पाण्याबद्दलची मानसिकता बदलण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाण्याचा अतिवापर हा हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. ग्राहकांना हॉटेलमध्ये गेल्यावर प्रथम पाण्याची सेवा मिळते. या वेळी पाण्याने भरलेल्या ग्लासातील पाणी अर्ध पिऊन बाकीचे ओतून दिले जाते. त्यामुळे पाण्याची प्रचंड नासाडी होते. म्हणून पाण्याची जनजागृती होण्यासाठी हॉटेलच्या दर्शनी भागावर पाणी बचतीची बोलकी चित्रे लावण्यात आली आहेत.
आहार संस्थेचे सरचिटणीस विश्वपाल शेट्टी यांनी यासंदर्भात सांगितले की, एक फुल भरलेल्या ग्लासामधून जर अर्धा ग्लास पाणी वाचविले, तर कित्येक लीटर पाण्याची बचत होऊ शकते. पाणी हे नैसर्गिक स्रोत आहे. तसेच आपल्याकडे पाण्याचा साठाही बराच कमी आहे. याशिवाय अजून पूर्ण मे महिना आपल्याला काढायचा आहे. त्यामुळे हॉटेल्समधील मालकांना सांगून पाणी बचतीला हातभार लावण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.