सलामीच्या पावसाने मुंबईकर आनंदले

By Admin | Published: June 12, 2016 04:58 AM2016-06-12T04:58:47+5:302016-06-12T04:58:47+5:30

गेल्या चार महिन्यांपासून ऊकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर शनिवारी सकाळी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने काहीसा दिलासा दिला. ऐनसकाळी दाटून आलेल्या ढगांनी शहरावर काळोख केल्यानंतर

Mumbaikar Anandle inaugurated the opening day | सलामीच्या पावसाने मुंबईकर आनंदले

सलामीच्या पावसाने मुंबईकर आनंदले

googlenewsNext

मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून ऊकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर शनिवारी सकाळी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने काहीसा दिलासा दिला. ऐनसकाळी दाटून आलेल्या ढगांनी शहरावर काळोख केल्यानंतर पावसाने वर्दी दिली. शहर व उपनगरात काही काळ पावसाच्या सरी कोसळल्या. त्याचा परिणाम दळणवळण यंत्रणेवर दिसून आला. बेस्ट आणि लोकल ‘वेग’ मंदावला. तर रस्त्यावर काही ठिकाणी आणि घरगल्ल्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे महापालिकेचे पितळ उघडे पडले.
दक्षिण भारतात दाखल झालेल्या मान्सूनचे अद्यापही राज्यासह मुंबईत आगमन झालेले नाही. तरीही शनिवारी झालेल्या पावसामुळे मुंबईकर आनंदले होते. दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे पावसाची चाहूल प्रकर्षाने जाणवत राहिली. पहिल्याच पावसाचा फटका बसल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली होती. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गासह लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक सेवेचा वेग काहीसा मंदावला होता. सुरुवातीला काहीकाळ पावसाचा वेग जास्त असल्याने शहर आणि उपनगरातील रस्त्यालगतच्या सखल भागात पाणी साचले होते. परंतू त्याचे प्रमाण कमी होती. महत्त्वाची बाब म्हणजे भल्या पहाटेच पावसाची चाहूल लागल्यानंतर मुंबई महापालिकेने पाणी साचणाऱ्या सखल ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी तैनात केले होते. शिवाय पाणी उपसण्यासाठी आवश्यक असणारे साहित्यही सज्ज ठेवले होते. यात प्रामुख्याने दादर, वांद्रे आणि हिंदमाता या प्रमुख ठिकाणांचा समावेश होता. परिणामी ऐनवेळेला मनुष्यबळ सज्ज ठेवल्याने पाणी साचण्याचा घटना घडल्या नाहीत, असा दावा यावर महापालिकेने केला. वॉचडॉग फाऊंडेशनने मात्र महापालिकेचा दावा खोटा ठरवला. शिवाय विजय नगर, मरोळ, अंधेरी पूर्वेकडील सेव्हन हिल रुग्णालयाजवळील सखोल ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारीही केल्या.
मुलूंड स्थानकात पावसामुळे पेंटाग्राफ पडल्याने सकाळी नऊच्या सुमारास प्रवाशांचा गोंधळ उडाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांनी फलाटावर धाव घेतली. यामुळे तब्बल वीस मिनिटे मुलूंड स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तसेच, मुलूंड कॉलनी, एलबीएस मार्ग, भांडुप सोनापूर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. सोनापूर येथील नाला पहिल्या पावसातच तुडुंब भरल्याने सांडपाणी, कचरा रस्त्यावर आल्याचे आढळले. चेंबूर कॅम्प परिसर व सायन पनवेल महामार्गावरील लाल डोंगर प्रवेशद्वाराजवळ पाणी साचले होते. तर सुमन नगर येथील पूर्वद्रुतगती मार्गावर निसरड्या रस्त्यामुळे अनेक दुचाकींचे किरकोळ अपघात झाले. (प्रतिनिधी)

बच्चेकंपनीने साधली खेळाची संधी
दुसरीकडे मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली खरी, मात्र या सरींचा मुंबईकरांना आनंद लुटला. एकीकडे कार्यालयीन वेळेवरच हजर झालेल्या पावसाने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला.
मात्र दुसरीकडे बच्चेकंपनी आणि तरुणाईने या पावसात धमाल केली. माझगाव येथे नेसबीट मार्गावर अचानक आलेल्या पावसाने वाहतूक कोंडी निर्माण झाली. तर भायखळा येथील जिजामाता उद्यानाशेजारील मैदानात तरुणाईच्या चमूंंनी एकत्र येत पहिल्याच पावसात फुटबॉल, व्हॉलीबॉलचा आनंद लुटला.
डोंगरी परिसरात हँकॉक पूलाचे काम सुरु असल्याने वाडीबंदर परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. शिवाय, पावसादरम्यान पूलाचे कामही काही वेळ बंद करण्यात आले होते.

Web Title: Mumbaikar Anandle inaugurated the opening day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.