मेट्रो भाडेवाढीविरोधात मुंबईकर संतप्त
By admin | Published: August 9, 2015 03:28 AM2015-08-09T03:28:44+5:302015-08-09T03:28:44+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दरनिश्चिती समितीच्या अहवालावर शिक्कामोर्तब केल्याने मेट्रो भाडेवाढीची कुऱ्हाड मुंबईकरांवर कोसळणार आहे. रिलायन्सकडूनही आॅक्टोबरनंतर प्रस्तावित भाडेवाढ लागू करण्याचे
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दरनिश्चिती समितीच्या अहवालावर शिक्कामोर्तब केल्याने मेट्रो भाडेवाढीची कुऱ्हाड मुंबईकरांवर कोसळणार आहे. रिलायन्सकडूनही आॅक्टोबरनंतर प्रस्तावित भाडेवाढ लागू करण्याचे जवळपास निश्चित झाल्याने मुंबईकरांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मेट्रो भाडेवाढीबाबत मुंबईकरांनी ‘लोकमत’कडे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सरकारने मेट्रो भाडेवाढीवर तोडगा काढावा यासह प्रवाशांनीच दरवाढीबाबत आवाज उठवावा, अशी संतप्त मते मुंबईकरांनी मांडली आहेत.
एमएमआरडीएचे न्यायालयात आव्हान
मुंबई : मेट्रो १ च्या प्रस्तावित भाडेवाढीविरोधात एमएमआरडीए पुढील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे एमएमआरडीए आयुक्त यूपीएस मदान यांनी सांगितले. त्यामुळे भाडेवाढीचा निर्णय पुन्हा न्यायालयात पोहोचणार आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो १ च्या भाडेवाढीचा वाद जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. न्यायालयाने भाडेवाढीबाबत दरनिश्चिती समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नेमण्यात आलेल्या समितीने मेट्रोचे भाडे १0 ते ११0 रुपयांपर्यंत वाढविण्याची शिफारस केली होती. या समितीच्या अहवालाला सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे. त्यामुळे मेट्रोचा तिकीट दरवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी एमएमआरडीए दरनिश्चिती समितीच्या अहवालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे मेट्रो भाडेवाढीचा निर्णय पुन्हा न्यायालयात पोहोचणार असून एमएमआरडीएच्या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
मेट्रोचे तिकीट दर वाढले तर सामान्यांना मेट्रोने प्रवास करणे कठीण होईल. त्यामुळे आता बेस्ट बस किंवा रिक्षा हाच पर्याय सामान्यांपुढे आहे. - नादिया शेख, अंधेरी
मेट्रोच्या महागड्या प्रवासापेक्षा सामान्यांना लोकलचे धक्के कधीही परवडले. सुखकर प्रवासासाठी सुरू केलेली मेट्रो दरवाढीमुळे तोट्यात जाईल. - फिरोज सय्यद, मुंब्रा
भाडेवाढीनंतर मेट्रो रेल्वे ही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी असेल. सर्वसामान्य पुन्हा पायपीट करतील.
- प्रेमकुमार चव्हाण, दहिसर
मेट्रो दरवाढीचा खर्च झेपणार नसल्याने प्रवाशांनी एकत्र येऊन दरवाढीविरोधात आवाज उठवला पाहिजे. - कृतिका सावंत, जोगेश्वरी
मेट्रो, मोनो प्रकल्प सामान्यांच्या सोयीसाठी आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला. मेट्रोच्या दरवाढीने सामान्यांसाठी मेट्रोचे दरवाजे कायमचे बंद होतील. - अर्पणा गमरे, गोवंडी
गेल्या काही महिन्यांत मेट्रोने अधिक नफा मिळविला आहे. परंतु, दरवाढीने सामान्यांना मेट्रोने प्रवास करणे कठीण होईल. त्यामुळे बेस्ट, रिक्षा किंवा लोकल या पर्यायी मार्गाने प्रवास करण्याकडे प्रवाशांचा कल असेल.
- हितेंद्र जाधव, वडाळा
दरवाढीमुळे चाकरमानी मेट्रोला ‘राम राम’ करून लोकल आणि बेस्ट बसचा पर्याय स्वीकारतील. त्यामुळे मेट्रोचीही अवस्था मोनोसारखी केवळ ‘जॉयराइड’साठी राहील असे वाटते.
- लोकेंद्र चौहान, बोरीवली
रिलायन्स समूहाने मेट्रोच्या आभासी जगाचे स्वप्न मुंबईकरांना दाखविले. परंतु आता मेट्रो प्रशासन केवळ आपला फायदा पाहत आहे. शासनाने दरवाढीचा पुनर्विचार करावा. - सुकन्या अगावणे, सायन
मेट्रोची भाडेवाढ हा मनमानी कारभार आहे. भाडेवाढीने रिलायन्सचे खिसे भरणार असून सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागेल. शासनाने नियंत्रण आणावे.
- स्वदीप साळवी, दिवा