मुंबईकर गिर्यारोहक लडाखमधील शिखर सर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2022 07:57 AM2022-08-03T07:57:42+5:302022-08-03T07:57:48+5:30
७५ भारतीय ध्वजांचे ध्वजतोरण फडकविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लडाखमधील कांग यात्से आणि डझो जोंगो शिखरावर निघालेल्या मोहिमेचा कारगिल वॉरियर नायक दीप सिंग यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आला. या मोहिमेसाठी मुंबईमधील वैभव ऐवळे आणि बाळकृष्ण जाधव (सोलापूर) हे बुधवारी रवाना होणार आहेत.
कांग यात्से - ६२५० मीटर आणि डझो जोंगो - ६२४० मीटर अशा दोन शिखरांवर चढाई करण्याची योजना आखण्यात आली. ११ ऑगस्टला कांग यात्से सर करून शिखर माथ्यावर रक्षाबंधन साजरी करून ही मोहीम सर्व भगिनींना समर्पित करत असल्याचे बाळकृष्ण यांनी सांगितले. १५ ऑगस्टला डझो जोंगो हे शिखर सर करून शिखरावर ७५ भारतीय ध्वजांचे ध्वजतोरण फडकवून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणार असल्याचे वैभव यांनी सांगितले. याआधी वैभव यांनी माउंट किलीमांजारो व माउंट एलब्रूस सर करून अनुक्रमे ७२ आणि ७३ ध्वजांचं तोरण फडकवत स्वातंत्र्य दिवस साजरा केला होता.
अवयवदानासाठी पुढाकार
देशात बऱ्याच रुग्णांना अवयवदानाची कमतरता भासते. त्यामुळे वैभव आणि बाळकृष्ण मोहिमेवरून आल्यावर अवयवदानासाठी अर्ज करणार आहेत. या मोहिमेद्वारे सर्वांनी अवयवदान करावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
युद्धातील शूरवीरांचा सत्कार
n कारगिल विजय दिवसानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित शोर्या तुला वंदितो सोहळ्यात कारगिल युद्धातील शूरवीरांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी युद्धभूमीवरील अनुभव उपस्थितांना सांगितले.
n या कार्यक्रमाला नायक दीपचंद, पोपटराव दाते, राम मोरे, कृष्णा कोंडेकर, रमेश सुरते उपस्थित होते. यांनी मोहिमेचा फ्लॅग ऑफ करून मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.