कारवाईच्या धास्तीने मुंबईकर घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 05:52 AM2021-04-24T05:52:57+5:302021-04-24T05:53:00+5:30

लॉकडाऊनचा पहिला दिवस; रस्ते सामसूम, बेस्ट, लोकलची गर्दी ओसरली

Mumbaikar in fear of action | कारवाईच्या धास्तीने मुंबईकर घरात

कारवाईच्या धास्तीने मुंबईकर घरात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करूनही गर्दी कमी होत नसल्याने शुक्रवारपासून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. त्यामुळे कारवाईच्या धास्तीने मुंबईकरांनी घरीच राहणे पसंत केले आहे.
अत्यावश्यक सेवेतील दुकाने ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. विशेषतः भाजीपाल्याच्या दुकानांसमोर ग्राहकांचे घोळकेच्या घोळके जमा झाल्याचे दिसून आले. दादरमध्ये किरकोळ विक्रेत्यांनी भाजी, फुले आणि अन्य घाऊक वस्तू खरेदी करण्यासाठी नेहमीप्रमाणे गर्दी केली होती. ११ वाजेनंतर मात्र मुंबईतील बहुतांश बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. पोलिसांची विशेष पथके बाजारपेठांमधील स्थितीवर लक्ष ठेवून असल्याने व्यापाऱ्यांनीही ११ वाजेनंतर शटर डाऊन केले.
मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पाेलिसांनी नाकाबंदी केल्याने विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची पंचाईत झाली. अत्यावश्यक सेवेत नसतानाही अनेकांनी खासगी वाहनांद्वारे कार्यालय गाठण्याचा प्रयत्न केला. काही जण त्यात यशस्वी झाले; परंतु काही पोलिसांच्या तावडीत सापडले. पोलिसांनी त्यांना समज देत परत पाठवले. काही ठिकाणी थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली.
लाेकलमध्ये ­गर्दी निम्म्यावर  
लोकल प्रवासासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना तिकीट मिळत नसल्याने खासगी कर्मचाऱ्यांनी घरीच राहणे पसंत केले. मासिक पासधारकांनी मात्र प्रवासाचे धाडस केले. बऱ्याच रेल्वेस्थानकांत तपासणी होत नसल्याने त्यांचे फावलेही. सीएसएमटी, चर्चगेट, दादर, भायखळा यासारख्या मोठ्या स्थानकांत ओळखपत्र तपासले जात असल्याने काही जण कारवाईच्या कचाट्यात सापडले. मात्र, नेहमीपेक्षा लोकलमध्ये गर्दी निम्म्याहून कमी हाेती. 
बेस्टमध्ये बिनधास्त प्रवास
बेस्टमध्ये एका आसनावर एका प्रवाशाला बसण्याची परवानगी देण्यात आल्याने गर्दी झाली नाही; परंतु प्रवाशांचे ओळखपत्र तपासले जात नसल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रवासीही प्रवास करताना दिसून आले.

पाेलिसांची पाठ फिरताच नाक्यांवर पुन्हा गर्दी
nमुख्य रस्ते, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असला तरी नाक्यांवरच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यात अद्याप यश आलेले नाही. हौशी तरुण, घरी असलेले नोकरदार, वयस्क नागरिक यांच्या गप्पांचे फड नाक्यानाक्यांवर रंगलेले दिसून आले. 
nबंगालची निवडणूक, केंद्र-राज्यातील संघर्ष, ऑक्सिजनची कमतरता, वाढती रुग्णसंख्या हे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. पोलिसांची गाडी येताना दिसली की, दुकानांच्या आडोशाला लपायचे आणि पोलिसांची पाठ वळली की, पुन्हा गर्दी करायची, असे चित्र सगळीकडे होते.
 

Web Title: Mumbaikar in fear of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.