मुंबई : मागच्या काही दिवसांत पाऊस गायब झाला असला, तरी शहर-उपनगरातील आजारांचे प्रमाण मात्र बळावते आहे. आॅगस्टच्या एकाच महिन्यात तापाचे तब्बल ९ हजार ४३१ रुग्ण पालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल झाले असून, त्यातील १ हजार ९३६ डेंग्यू आणि डेंग्यूसदृश्य रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय, स्वाइन फ्लू आणि डेंग्यूमुळे प्रत्येकी दोन, तर मलेरिया व लेप्टोमुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू ओढावला आहे. त्यामुळे आता पालिकेच्या आरोग्य खात्याने मुंबईकरांना काळजी करण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास, त्वरित डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.स्वाइन फ्लूमुळे कुर्ला येथील ३६ वर्षीय महिलेचा आणि ७ आॅगस्ट रोजी तर मालाड येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा १२ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. डेंग्यूमुळे ग्रँटरोड येथील २० वर्षीय मुलाचा १३ आॅगस्ट रोजी तर जोगेश्वरी येथील ७९ वृद्धेचाही डेंग्यूने बळी घेतला. याशिवाय, माटुंगा येथील कामगार वसाहतीतील २९ वर्षीय तरुणीचा २२ आॅगस्ट रोजी मलेरियामुळे मृत्यू झाला, तर ४ आॅगस्ट रोजी लेप्टोमुळे ४९ वर्षीय बोरीवली येथील व्यक्तीचा मृत्यू झाला.आॅगस्ट महिन्यात कॉलराचे रुग्णदेखील आढळून आले आहेत. त्यातील दोन धारावी, एक चेंबूर आणि एक मानखुर्दमधील आहे. या महिन्यांत आजाराने ओढावलेल्या मृत्यूनंतर, शहर-उपनगरांतील २ हजार ७७० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात १२ हजार १०४ लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच उंदीर पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम १२४ घरांमध्ये राबविण्यात आली, त्यात ७५ ठिकाणी ७५ बिळे आढळून आली. तीन सापळ्यांत दोन उंदीर पकडण्यात आले, तर ४७ बिळांमध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकण्यात आले.
मुंबईकर तापाने फणफणले! एकाच महिन्यात ९,४३१ तापाचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 3:01 AM