मुंबईकर तापाने फणफणले

By Admin | Published: July 27, 2016 03:04 AM2016-07-27T03:04:57+5:302016-07-27T03:04:57+5:30

पावसाळा सुरू झाल्यावर भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी विविध प्लॅन्स केले जातात. पण एन्जॉय करताना विशेष काळजी न घेतल्यास आजारी पडण्याचा धोका अधिक असतो.

Mumbaikar froth | मुंबईकर तापाने फणफणले

मुंबईकर तापाने फणफणले

googlenewsNext

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी विविध प्लॅन्स केले जातात. पण एन्जॉय करताना विशेष काळजी न घेतल्यास आजारी पडण्याचा धोका अधिक असतो. गेल्या दोन आठवड्यांत विविध तापांचे सुमारे ४ हजार रुग्ण आढळले आहेत. जुलै महिन्यात लेप्टोमुळे चार जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे पाऊस एन्जॉय करताना मुंबईकरांनी विशेष काळजी घ्या, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पावसाला सुरुवात झाल्यावर साथीच्या आजारांचे रुग्ण वाढतात. जून महिन्याच्या अखेरीस सुरू झालेल्या पावसाने आता मुंबई आणि उपनगरात थोडी उसंत घेतली आहे. पण याच दरम्यान रुग्णांचा आलेख चढत असल्याचे चित्र दिसून आले आहे. ताप, डेंग्यू, मलेरिया आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या दोन आठवड्यांत ४ हजारांच्या घरात गेली आहे. फक्त तापाचे ३ हजार ७०२ रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली .
पावसाळ्यात पाणी साठून राहिल्यास त्यात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे महापालिका पाणी साठू देऊ नका, परिसर स्वच्छ ठेवा, असे आवाहन करते. पण तरीही डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण मुंबईत मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. ११ ते २४ जुलै दरम्यान मलेरियाचे २९६ रुग्ण आढळून आले आहेत, तर डेंग्यूच्या २२९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॉलराचे ३ रुग्ण आढळून आले आहेत. दूषित अन्नपदार्थ आणि पाण्यामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण आढळत आहेत. पण गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही. दोन आठवड्यांमध्ये गॅस्ट्रोचे ८५० रुग्ण आढळूले आहेत. लेप्टोच्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे. लेप्टोच्या २४४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात लेप्टोने डोके वर काढले होते. त्यामुळे यंदा लेप्टोला आळा घालण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली होती.

पावसाळ्यात होणारे आजार
ताप, लक्षणे - कणकण, सुस्ती येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, उदासीनता येणे
लेप्टोस्पायरोसिस, लक्षणे - थंडी वाजणे, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, पोटदुखी, डोळे लाल होणे, काही वेळा त्वचेवर रॅश येणे
स्वाइन फ्लू, लक्षणे - सर्दी, घशात खवखव, ताप, अंगदुखी
गॅस्ट्रो, लक्षणे - पोटाच्या वरच्या भागात दुखणे, अन्नावरची इच्छा उडणे, उलट्या, ढेकर येणे, भूक मंदावणे
कावीळ, लक्षणे - अस्वस्थता वाटणे, सांधेदुखी, ताप, उलट्या किंवा अन्नावरची इच्छा उडणे, डोकेदुखी
टायफॉइड , लक्षणे - भूक कमी लागणे, डोकेदुखी, अंगदुखी, ताप (४ डिग्रीपर्यंत जाऊ शकतो), सुस्तपणा येणे, उलट्या होणे, अन्नावरची इच्छा उडणे
कॉलरा, लक्षणे - जुलाब, डायरिया, अशक्तपणा येणे, डिहायड्रेशन, पोटदुखी

डासांमुळे होणारे आजार
मलेरिया, लक्षणे - ताप, थंडी वाजणे, सांधे दुखणे, उलट्या होणे
डेंग्यू, लक्षणे - ताप, स्नायू दुखणे, सांधेदुखी, डोकेदुखी, अन्नावरची इच्छा उडणे, पुरळ उठणे
चिकनगुनिया, लक्षणे - आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक काळ ताप येणे, डोकेदुखी, तीव्र सांधेदुखी, अन्नावरची इच्छा उडणे किंवा उलट्या होणे, डोळ्यांचा दाह होणे

हे जरूर करा : पाणी उकळून, गाळून प्या, ताजे शिजलेले अन्न खा, खाण्याआधी हात स्वच्छ धुवा, साचलेल्या पाण्यातून चालू नका , पायाची जखम उघडी ठेवू नका, बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा, घराच्या परिसरात साचलेले पाणी काढून टाका.

तापाचे रुग्ण शोधण्यासाठी केली पाहणी
मुंबईत गेल्या दोन आठवड्यांत तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर लेप्टोच्या रुग्णांमध्येही ताप अंगावर काढल्याने गुंतागुंत वाढून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत १ हजार ७३० घरांची तपासणी करण्यात आली.

ताप अंगावर काढू नका
पावसाळी आजार टाळण्यासाठी मुंबईकरांनी विशेष काळजी घ्या. लेप्टो टाळण्यासाठी साचलेल्या पाण्यातून चालत जाऊ नका. ताप आल्यास ताप अंगावर काढू नका. कारण, लवकर निदान आणि उपचार न झाल्यास गुंतागुंत वाढते. त्यामुळे आजारी पडल्यास तत्काळ डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार घ्या.
- डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका

Web Title: Mumbaikar froth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.