तापदायक उन्हामुळे मुंबईकर घामाघूम; कमाल तापमान वाढणार, हवामान शास्त्र विभागाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 02:32 AM2019-05-18T02:32:06+5:302019-05-18T02:32:16+5:30
वाढता उकाडा, तापदायक ऊन आणि वाढत्या आर्द्रतेने मुंबईकर घामाघूम झाले आहेत. त्यातच आता १८ ते २१ मेदरम्यान मुंबईतील कमाल तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला.
मुंबई : वाढता उकाडा, तापदायक ऊन आणि वाढत्या आर्द्रतेने मुंबईकर घामाघूम झाले आहेत. त्यातच आता १८ ते २१ मेदरम्यान मुंबईतील कमाल तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला.
१८ मे रोजी मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश तसेच किमान तापमान २५ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात येईल. १९ मे रोजी कमाल तापमान ३५ तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने मान्सूनचा अंदाज वर्तवला असतानाच आता राज्याच्या वातावरणात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत आहेत. राज्यात काही ठिकाणी अवेळी पावसाची नोंद करण्यात येत असून, विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील बहुतांश शहरांच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात आली आहे.
किमान तापमान २० अंश सेल्सिअसवर येऊन ठेपले आहे. दुसरीकडे वाढता उकाडा, तापदायक ऊन आणि वाढत्या आर्द्रतेने मुंबईकर घामाघूम झाले आहेत.
राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात १९ मेपासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बºयाच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे २५ मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. यादरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान ४२ अंशाच्या आसपास राहील, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम होत आहेत. यात उत्तरोत्तर वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवल्यामुळे मुंबईकरांना आता पावसाची प्रतीक्षा आहे.