मुंबईकर गारठले, रात्रीसह दिवसाही झोंबतो गारवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 04:56 AM2019-01-26T04:56:27+5:302019-01-26T04:56:41+5:30
मध्यंतरी कमी झालेला थंडीचा कडाका राज्यासह मुंबईत पुन्हा एकदा वाढला आहे.
मुंबई : मध्यंतरी कमी झालेला थंडीचा कडाका राज्यासह मुंबईत पुन्हा एकदा वाढला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीत वाºयामुळे राज्यासह मुंबई गारठली असून, शुक्रवारी तर मुंबईचे किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात घसरण नोंदविण्यात येत असून, मुंबईत दिवसा वाहणाºया वाºयामुळे मुंबईकरांना आता रात्रीसह दिवसाही गारवा झोंबू लागला आहे. दुसरीकडे किमान तापमानात घसरण होत असतानाच, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आल्याने, हिवाळ्यात पावसाळा सुरू झाल्याचे चित्र आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९ अंश सेल्सिस नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे, तर २६ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २७ जानेवारी रोजी मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २८ जानेवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. शनिवारी मुंबईचे किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील, असाही अंदाजही हवामान खात्याने वर्तविला.
>गारठलेली शहरे
पुणे - ९.३, अहमदनगर - ९
नाशिक - ९.२, सातारा - १०.४