‘सूर ज्योत्स्ना’मध्ये मंत्रमुग्ध झाले मुंबईकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 06:03 AM2019-04-11T06:03:56+5:302019-04-11T06:04:28+5:30
मुंबई : ‘कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला अंतपार याचा...’ असा भक्तीमय सूर आळवताच सुरू झालेल्या श्रोत्यांचा टाळ्यांनी विसावा ...
मुंबई : ‘कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला अंतपार याचा...’ असा भक्तीमय सूर आळवताच सुरू झालेल्या श्रोत्यांचा टाळ्यांनी विसावा घेतला तो थेट गीताच्या शेवटीच... किंबहुना त्यानंतरही श्रोत्यांच्या टाळ्या बराच वेळ सुरूच होत्या. ^‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्कार सोहळ्यात महेश काळे यांनी आपल्या शास्त्रीय संगीताच्या शैलीत सादर केलेल्या अभंग गायनाने जणू जादूई वातावरणनिर्मिती केली. विशेष म्हणजे याला गायिका कौशिकी चक्रवर्ती यांची साथ लाभली आणि जणू दुग्धशर्करा योगच जुळून आला. ‘सूर ज्योत्स्ना’ कार्यक्रमातील महेश काळे आणि कौशिकी यांच्या शास्त्रीय संगीताच्या उत्कृष्ट सादरीकरणाने रसिक श्रोत्यांना तब्ब्ल साडेतीन तास स्वरांच्या मैफलीत मंत्रमुग्ध केले.
वरळी येथील नेहरू सेंटरच्या सभागृहात मंगळवारी संध्याकाळी लोकमत आयोजित ‘सूर ज्योत्स्ना’ कार्यक्रमात अल्पावधीतच मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घालणारी गायिका आर्या आंबेकर आणि प्रख्यात शास्त्रीय गायक तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव शिखर नाद कुरेशी हे सूर ज्योत्स्नाचे यंदाचे पुरस्कार विजेते. शिखर नाद कुरेशी कार्यक्रमास हजर होते. मात्र, एम.ए.च्या परीक्षेमुळे आर्या हजर राहू शकली नाही. तिने आपले मनोगत दृकश्राव्य माध्यमातून पाठवून दिले होते. तिचा हा संदेश उपस्थित रसिकांना दाखविण्यात आला.
याप्रसंगी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, राज्याचे प्रधान सचिव भूषण गगरानी, उद्योजक सज्जन जिंदाल, रिलायन्सच्या बिजल मेसवानी आणि बर्वे इंजिनीअरिंग कंपनीच्या संचालिका सुप्रिया बडवे या मान्यवरांच्या हस्ते शिखर नाद कुरेशी यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला सहव्यवस्थापकीय आणि संपादकीय संंचालक ऋषी दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा उपस्थित होते. यानंतर शिखर नाद कुरेशी यांनी डुम्बे हे वाद्य वाजविले. शिखर यांच्या बोटांची थाप या वाद्यावर पडताच त्यातून निघणारे सूरही थिरकतच सभागृहात घुमले आणि प्रत्येक श्रोता ‘वाह उस्ताद...’ म्हणत मंत्रमुग्धपणे ते ऐकत राहिला. शिखर यांच्या बोटातून डुम्बेवर निनादणाऱ्या सुरांनी मैफलीत एक वेगळा आनंद निर्माण केला.
ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे ‘सूर ज्योत्स्ना’ हा कार्यक्रम म्हणजे सुरांची दुनिया आहे आणि ज्योत्स्ना दर्डा यांचे थेट सुरांशी नाते असल्याचे विजय दर्डा यांनी आपल्या भाषणात आवर्जून नमूद केले. ज्यांच्याजवळ संगीत आहे, त्यांच्याजवळ भक्ती आहे आणि ज्यांच्याजवळ भक्ती आहे त्यांच्याजवळ नारीशक्ती आहे, असे ज्योत्स्ना दर्डा यांचे मत होते. त्यांनी अनेकाविध उपक्रमांतून महिला सक्षमीकरण केले असून त्यासाठी संगीताची निवड केली. भारतीय शास्त्रीय संगीत घराघरांत पोहोचविणे हा या पुरस्काराचा उद्देश असल्याचे मत विजय दर्डा यांनी व्यक्त केले. या उपक्रमाला यवतमाळमध्ये सुरुवात झाली. त्यानंतर नागपूर, नाशिक, कोल्हापूर आणि मुंबईमध्ये कार्यक्रम पार पडले. यानंतर पुण्यात २० एप्रिलला, तर दिल्लीत २६ एप्रिलला कार्यक्रम पार पडतील.
पटियाला घराण्याचे गायक अजय चक्रवर्ती यांच्या कन्या असलेल्या कौशिकी चक्रवर्ती यांनी श्यामकल्याण रागाने त्यांच्या मैफलीला सुरुवात केली. कौशिकी यांना साबिर खान, अजय जोगळेकर आणि सत्यजीत तळवलकर यांनी साथ दिली. शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत अशा शैलीत गाणाऱ्या कौशिकी यांच्या बंदिशीतील हरकतींना श्रोत्यांची उर्त्स्फुत दाद मिळत होती.
कौशिकींनंतर महेश काळे यांच्या सदाबहार मैफलीला सुरुवात झाली. शास्त्रीय आणि नाट्यसंगीताच्या पारंपरिक शैलीला नावीन्य आणि आधुनिकतेची जोड देत नव्या पिढीलाही त्या निरागस सुरांवर प्रेम करायला लावणारे नव्या पिढीचे लोकप्रिय गायक महेश काळे यांनी आपल्या गुरूंच्या दोन आणि स्वत:ची अशी एक बंदिश सादर करीत श्रोत्यांची मने जिंकली. त्याची पोचपावती त्यांना श्रोत्यांच्या टाळ्यांच्या रूपात मिळतच होती. त्यानंतर महेश काळे आणि कौशिकी यांची जुगलबंदी ही ‘सूर ज्योत्स्ना’ कार्यक्रमासाठी उपस्थित रसिकांसाठी पर्वणीच ठरली.
...अन् तो क्षण कैद करण्यासाठी रसिकांचे मोबाइल उंचावले
महेश काळे यांचा आलाप असो वा कौशिकी यांनी घेतलेली हरकत... हा क्षण कायमचा आपल्या मनात साठविण्यासाठी उपस्थित संगीत रसिकांनी आपले मोबाइल उंचावले होते. संगीत रसिकांनी मोबाइलमध्ये या दोघांच्याही गायनाचे दृकश्राव्य पद्धतीने रेकॉर्डिंग केले. शिवाय, कार्यक्रमानंतरही रसिकांनी या दोन्ही कलाकारांना भेटण्यासाठी गर्दी केली. या कलाकारांनीही कृतज्ञतापूर्वक रसिकांची गाठभेट घेत छायाचित्रे काढू दिली आणि स्वाक्षºयाही दिल्या.
अप्रतिम जुगलबंदी
‘लोकमत’ने आजपर्यंत नेहमीच नवीन टँलेटला वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नवीन कलाकारांना नक्कीच एक स्फूर्ती मिळू शकते. कौशिकी चक्रवर्ती ही सध्या भारतीय क्लासिक संगीतातील एक अत्यंत गुणी गायिका आहे. ‘लोकमत’च्या मंचावरून कौशिकीला ऐकायला मिळणे ही खरेच एक अपूर्वाई आहे. या संगीतमय मैफलीची अखेर महेश काळे आणि कौशिकीच्या जुगलबंदीने झाली. ही अप्रतिम जुगलबंदी संपूच नये असे सभागृहात उपस्थित प्रत्येकाला वाटत होते.
- डॉ. नेहा राजपाल, गायिका
श्रेय ‘लोकमत’ला
‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्याचा मान मिळाला ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. ‘लोकमत’ने अक्षरश: गावागावांतून संगीतातील पंचरत्ने शोधली आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. भविष्यात ही संगीतरत्ने भारतीय संगीतविश्वात आपले नाव नक्कीच उज्ज्वल करतील; आणि याचे संपूर्ण श्रेय त्यांंच्या कलेला वाव देणाºया ‘लोकमत’ला जाते. महेश काळे आणि कौशिकी चक्रवर्तीच्या बहारदार मैफलीने ‘सूर ज्योत्स्रा’ या संगीतमय पुरस्कार सोहळ्याला चारचांद लागले.
- मंगेश बोरगावकर, गायक
या मान्यवरांनी केली विजेत्यांची निवड
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक सोनू निगम, रूपकुमार आणि सोनाली राठोड, शास्त्रीय संगीत तज्ज्ञ शशी व्यास, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा आणि टाइम्स म्युझिकच्या गौरी यादवडकर या मान्यवरांनी सहाव्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.