मुंबईकर तापाच्या साथीने हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 12:48 AM2019-08-04T00:48:15+5:302019-08-04T06:47:55+5:30
बाह्यरुग्ण कक्षात रुग्णांची गर्दी; दवाखान्यांत रुग्णांची संख्या दुपटीने वाढली
मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा दमदार सरींची सुरुवात झाल्याने ढगाळ वातावरणामुळे शहरात सध्या तापाच्या साथीने ठाण मांडले आहे. शहर उपनगरातील सरकारी आणि खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे, यात लहानग्यांचा समावेशही अधिक आहे. पाऊस, बदलते हवामान, त्यातच तापाची साथ, अशा वातावरणात डोक्याला ‘ताप’ होईल, अशी अवस्था आहे. तापासह सर्दी, खोकला यांसारख्या आजारांनी थैमान घातले आहे. अनेक वस्त्यांमध्ये गढूळ पाण्यामुळे अनेकांना डायरियाची लागण होत आहे. दवाखान्यांत रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे, तसेच सध्याचे वातावरण डेंग्यू आणि स्वाइन फ्लूसदृश आजाराच्या वाढीसाठी पोषक असल्याने शहरभर भीतीचे वातावरण आहे.
कान, नाक व घसा आणि मेडिसिन विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये घशात दुखणे, गिळताना त्रास होणे, खवखव होणे, घशात आतून बारीक पुरळ येणे, टॉन्सिलच्या गाठी सुजणे, सर्दीमुळे नाक चोंदणे, पोटात वेदना, जुलाब अशा तक्रारी वाढल्या आहेत. वातावरणातील दमटपणा आजार पसरविणाºया व्हायरसला पोषक ठरत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागाच्या ओपीडीत गेल्या आठवडाभरात रोज दोनशे रुग्णांनी उपचार घेतले. यातील बहुतांश रुग्ण हे सर्दी, ताप, खोकल्याच्या तक्रारी घेऊन आलेले आहेत.
बाह्यरुग्ण विभागात रोज तपासणीला येणाºया रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दररोज येणाऱ्या रुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण सध्या सर्दी, ताप, खोकला आणि पोटाच्या विकारांच्या तक्रारी घेऊन येत आहेत, अशी माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली. कोणत्या प्रकारचा ताप आला आहे, हे समजण्यासाठी तापाचे कारण शोधणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या करणे गरजेचे आहे.
मलेरिया आणि विविध जंतुसंसर्ग तापांमध्ये रक्ताची तपासणी केली जाते. विषमज्वरच्या विविध तपासण्या आहेत. टीबी, डेंग्यू, न्यूमोनिया यांच्याही तपासण्या आहेत. डॉक्टरांना विचारून या तपासण्या केल्या, तरच तापाचे कारण समजू शकेल. ताप आल्यास डॉक्टरांना दाखविणे आवश्यक आहे.
तापाचे घातक परिणाम
अधिक प्रमाणात ताप असेल किंवा ताप खूप काळ असेल आणि रुग्णाला अन्य काही आजार असतील, तर तापाचे घातक परिणाम होऊ शकतात. अतितापामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. काही विकारांमध्ये ताप मेंदूत जातो आणि रुग्ण दगावू शकतो. मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरसिस, विषमज्वर आदी विकारांचे निदान झाल्यास, त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार करा. तापाला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
काय काळजी घ्याल?
पाणी उकळून व गाळून प्या.
पालेभाज्यांचा आहार पावसाळ्यात कमी ठेवा.
उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका.
डासांचा बंदोबस्त करा.
दूषित पाण्याचे पिऊ नका.