मुंबईकर कोमल जैन सीए परीक्षेत देशात पहिली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 06:57 AM2021-02-03T06:57:47+5:302021-02-03T06:58:14+5:30
CA exam Result : नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या सीए (चार्टर्ड अकाउंटंट) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला
मुंबई : नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या सीए (चार्टर्ड अकाउंटंट) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला असून, मुंबईकर कोमल जैन हिने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. ८०० पैकी ६०० गुण मिळवीत कोमलने हे यश संपादित केले. तिने पोदार महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतील पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुरतच्या मुदित अग्रवाल याने देशात दुसरा, तर मुंबईच्याच राजवी नाथवानी हिने तृतीय स्थान प्राप्त केले.
परीक्षेसाठी एकूण ४,७१,६१९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. यात सीए फाउंडेशन, इंटरमिजिएट व फायनलच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल ५.८४ टक्के
सीएच्या जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल ५.८४ टक्के लागला आहे.
जुन्या अभ्यासक्रमातील परीक्षेत सालेम येथील एसाकीराज ६९.१३% गुण मिळवीत प्रथम, चेन्नईची सुप्रिया आर. ६२.६३% मिळवीत दुसरी, तर जयपूर येथील मयांक सिंह ६१.१३% गुण मिळवीत तिसरा आला.
ग्रुप १ व ग्रुप २ मिळून ४,१४३ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी २४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेला खूप विरोध झाला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. ज्यांना परीक्षा देता आली नाही, त्यांना जानेवारीत आणखी एक संधी देण्यात आली. सीए परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमाचा निकाल १४.४७ टक्के लागला आहे.