मुंबईकर मनू बारियाचे जेतेपद
By admin | Published: May 15, 2017 12:54 AM2017-05-15T00:54:57+5:302017-05-15T00:54:57+5:30
मुंबईकर मनू बारिया याने ५३व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष वयस्कर गटाचे जेतेपद पटकावताना ठाण्याच्या अब्दुल सातारला दोन गेममध्ये नमवले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकर मनू बारिया याने ५३व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष वयस्कर गटाचे जेतेपद पटकावताना ठाण्याच्या अब्दुल सातारला दोन गेममध्ये नमवले. त्याचवेळी, महिला वयस्कर गटामध्ये कोल्हापूरच्या शोभा कामतने बाजी मारताना मुंबईच्या रोझिना गोडाडला सहजपणे नमवले.
महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या मान्यतेने आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुष वयस्कर अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. ठाण्याच्या अब्दुलने मुंबईच्या कसलेल्या मनूला जबरदस्त झुंजवले. परंतु, अनुभवाच्या जोरावर मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना मनूने २५-२३, २५-२३ अशी बाजी मारत जेतेपदाला गवसणी घातली. त्याचवेळी, महिला वयस्कर गटाचा सामना एकतर्फी झाला. शोभा कामतने सुरुवातीपासून राखलेले वर्चस्व अखेरपर्यंत कायम राखताना मुंबईच्या रोझिना गोडाडला सरळ दोन गेममध्ये २५-८, २५-१४ असे सहजपणे नमवले.
दुसरीकडे, पुरुष गटात रत्नागिरीच्या अभिषेक कदमने उपांत्य फेरी गाठताना मुंबईच्या जितेंद्र काळेचे आव्हान १३-२५, २५-५, २५-९ असे परतावले. पहिला गेम जिंकून आघाडी घेतल्यानंतर जितेंद्रला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. तसेच, मुंबईचा कसलेल्या रियाझ अलीला उपांत्य फेरीसाठी मुंबईच्याच संदीप दिवेविरुद्ध तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. पहिला गेम गमावल्यानंतर रियाझने जबरदस्त पुनरागमन करताना १२-१५, २५-२६, २५-१३ असा विजय मिळवून संदीपचा पाडाव केला. महिलांमध्ये मुंबईच्या आयेशा मोहम्मदने पहिला गेम गमावल्यानंतर पिछाडीवरून बाजी मारताना अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, मुंबईच्या काजल कुमारीने पालघरच्या पिंपळेविरुद्ध सरळ दोन गेममध्ये विजय मिळवताना अंतिम फेरी गाठली.