मुंबई : ‘बुरा ना मानो, होली है’ म्हणत मुंबईकरांनी रंगबेरंगी रंगांची उधळण करतच सोमवारी धुळवडीचा आनंद लुटला. या रंगांचा बेरंग होऊ नये, म्हणून पाण्यासह रासायनिक रंगांना बगल देत बहुतेक ठिकाणी मुंबईकरांनी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांना, गुलालाला पसंती दर्शवली.मुंबई महानगरपालिकेसह पर्यावरण विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या जनजागृतीसह ‘लोकमत’ने पाणी वाचवा आणि रासायनिक रंगांचा वापर टाळण्याचे आवाहन मुंबईकरांना केले होते. त्याला मुंबईकरांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात साथ दिली. काही ठिकाणी कमीत-कमी पाण्याचा वापर करत, तर काही ठिकाणी थेट पाण्याला बगल देत तरुणाईने गुलालाची लयलूट केली. डीजेवर वाजणाऱ्या होळीच्या पारंपरिक गाण्यांसह नव्या रिमिक्सच्या तालावर होळी खेळणाऱ्यांनी ठेका धरला होता. रस्त्यावरून चालणारा एकही पादचारी रंगल्याशिवाय पुढे जाता कामा नये, याची चाळकरी जातीने खबरदारी घेत होते. मुंबई शहरासह उपनगरांत सकाळपासून पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. होळीच्या नावावर विनाहेल्मेट आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. दक्षिण मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भेंडी बाजार, सीएसटी असे प्रमुख मार्ग आणि परिसरांत पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. त्यामुळे दार पिऊन गाडी चालवणाऱ्या तळीरामांमध्येही कायद्याची धाक दिसला. (प्रतिनिधी)काळाचौकीत ‘पर्यावरणस्नेही रंगोत्सव’नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमी साजरी करावी व पर्यावरणाचे तसेच आपल्या आरोग्याचे रक्षण करावे, असा संदेश देत ह्युमॅनिटी फाऊंडेशन संस्थेने अभ्युदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सहकार्याने ‘पर्यावरणस्नेही रंगोत्सव’ उपक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ह्युमॅनिटी फाऊंडेशनचे अध्यक्ष व पर्यावरणतज्ज्ञ संजय शिंगे यांनी या उपक्रमाची माहिती देऊन, नैसर्गिक रंग बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. उपस्थितांना पर्यावरण संरक्षण व सवंर्धन करण्याचे आवाहन करत संस्थेचे कार्याध्यक्ष तानसेन कदम, सह-सचिव राजेश ठालम यांनी मार्गदर्शन केले. अभिनेता विवेक सांगळे याने कार्यक्रमाला हजेरी लावली व कार्यक्रमाचे कौतुक केले.जय कापरेश्र्वर ग्रुपकडून मोफत गुलालकॉटन ग्रीन पश्चिमेकडील घोडपदेव परिसरातील जय कापरेश्र्वर ग्रुपने पर्यावरणस्नेही होळीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सामील होणाऱ्या नागरिकांना पाण्यासह रासायनिक रंगांना बगल देण्याची अट बंधनकारक होती. तर डीजेच्या तालावर ताल धरत होळी खेळणाऱ्यांना ग्रुपतर्फे मोफत गुलाल आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाला विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त साथ दिल्याचे ग्रुपचे सदस्य नीलेश पिसाळ यांनी सांगितले.मुंबई : मुंबईत धुळवड उत्साहात साजरी होत असताना रंगांमुळे अथवा रस्ते अपघातांमध्ये एकूण ९४ जण किरकोळ जखमी झाले असून त्यापैकी चौघांना गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील महापालिका आणि सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेच्या प्रमुख केईएम, नायर आणि सायन रुग्णालयात मिळून ४० जणांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी २ जणांना रस्ते अपघातात जखमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १० जणांना रंगामुळे डोळ्याला इजा झाली होती. पण प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. तर जे.जे. रुग्णालयात ३० आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात १४ आणि जी.टी. रुग्णालयात १० जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. जे.जे. रुग्णालयात ६० वर्षीय पुरुषाला हिप फ्रॅक्चरमुळे दाखल करण्यात आले आहे, तर ३० वर्षीय मुलाला डोक्याला मार बसल्यामुळे दाखल करण्यात आले आहे. धुळवडीला रंगांमुळे डोळ्याला इजा होण्याचे प्रमाण कमी असते़ यावषी पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन सामाजिक संघटनांनीकेले होते़ त्यामुळे बहुतांश ठिकाणी इको फ्रेंडली रंग वापरून रंगपंचमी साजरी करण्यात आली़ त्यातूनही रस्ते अपघातात जखमी झाल्याच्या काही घटना घडल्या़ अपघात जीवीत हानी झाली नाही (प्रतिनिधी)
रंगात रंगले मुंबईकर!
By admin | Published: March 14, 2017 4:31 AM