१ लाख १० हजार १९३ पालकांनी नोंदवली मते
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील जवळपास दीड वर्ष घरातून ऑनलाइन शिक्षण घेतल्यानंतर पालकांना मुलांच्या शाळा प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याची उत्सुकता लागली आहे. एससीईआरटीच्या सर्वेक्षणात तब्बल ८१ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवायची तयारी दाखवली आहे. त्यात मुंबई विभागातील एकूण १ लाख १० हजार १९३ एवढ्या मोठ्या संख्येने पालकांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला आहे. यामध्ये पालिका विभागातील ७० हजार ८४२ तर मुंबई उपसंचालक विभागातील ३९ हजार ३५१ पालकांचा सहभाग आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे मुंबई विभागही अनलॉक होत असला, तरी अद्याप पालिका विभागाकडून असलेले कडक निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आलेले नाहीत. शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीचीच अट कायम आहे. त्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी नसल्याने मुंबईतील पालकांचा शाळा सुरू करण्यासंदर्भातील हा प्रतिसाद अनाकलनीय असल्याच्या प्रतिक्रिया काही शिक्षकांमधून व्यक्त होत आहेत. मात्र, ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, किमान आठवड्यातून एका दिवसाआड तरी ४ ते ५ तासांचे वर्ग भरविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी पालकांची मागणी आहे.
-----------
म्हणून शाळा सरू व्हाव्यात
नववी-दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास कठीण जात आहे. दहावीच्या अभ्यासासाठी संकल्पना स्पष्ट होणे, त्यांचा अभ्यासात प्रत्यक्षात वापर कसा करतात, हे समजणे आवश्यक आहे. ऑनलाइन शिक्षणातून ही उद्दिष्टे साध्य होताना दिसत नाहीत. शाळांनी जबाबदारी घेऊन किमान शिक्षक शाळांमध्ये उपलब्ध करून द्यावेत. म्हणजे विद्यार्थी आवश्यकता भासेल तेव्हा त्यांच्याकडे येऊ शकतात.
- सुवर्ण कळंबे , पालक
----
निश्चित अभ्यासक्रम, साचेबद्ध अभ्यास होत नसल्याने मुलं अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहेत. शिक्षकांचे लसीकरण करून, शाळांची स्वच्छता करून काही तासांचीच शाळा भरविणे हा उपाय ठरू शकतो. शाळा सुरु केल्या तरी उपस्थिती ऐच्छिक ठेवावी.
- मनीषा शिंदे, पालक
-----
शाळा सुरू करण्यात अडचणी फार
शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाच तर त्यापूर्वी शाळांना त्यांनी वेतनेतर अनुदान द्यावे. शाळांचे निर्जंतुकीकरण, शिक्षक, विद्यार्थ्यांचे लसीकरण, ऑक्सिमीटर, थर्मामीटर सारख्या सुविधांची सोय याची जबाबदारीही सरकारने घ्यावी.
- पांडुरंग केंगार, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना
पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार असले तरी अद्याप त्यांच्या आणि आमच्या लसीकरणाचा प्रश्न कायम आहे. शाळा सुरू करायच्या असतील तर सर्व शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने आणि पूर्ण होणे आवश्यक आहे.
- निरंजन पाटील, शिक्षक
-------
पालकांना मुलांमध्ये जाणवत असलेले बदल
- आळशीपणात आणि वजनात वाढ
- दैनंदिन सवयींच्या वेळा बदलल्या
- कानाच्या, डोळ्यांच्या तक्रारींत वाढ
- डोकेदुखीची समस्या जाणवते
- पाठदुखीच्या त्रासाने हैराण
- चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा, चंचलता वाढली
- विद्यार्थ्यांत आत्मविश्वास, एकाग्रता, समाधान कमी झाले