Join us  

शोभायात्रांसाठी मुंबईकर सज्ज

By admin | Published: March 27, 2017 7:01 AM

अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील शोभायात्रांचे

मुंबई : अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील शोभायात्रांचे नियोजन करणाऱ्या स्वागत समित्यांसह तरुणाईही सज्ज झाली आहे. गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला पोहोचला असून गिरगावातील शोभायात्रांची धामधूम आता मुंबईत गिरणगावासह उपनगरांतही दिसत आहे. संस्कृतीचे भान राखताना सामाजिक विषयांची हाताळणी हे यंदाच्या शोभायात्रांमधील प्रमुख आकर्षण ठरणार आहे.मुंबईतील गिरगावसह लालबाग, भायखळा व माझगाव या गिरणगाव परिसरांत सकाळी ८ वाजता शोभायात्रांना सुरुवात होईल. गिरणगावातील शोभायात्रेत ढोल-ताशा पथकांसह पारंपरिक वेशभूषेतील स्त्री-पुरुष, भगव्या पताका घेऊन संचलन करणारी पथके, छत्रपती शिवाजी महाराजांसह मावळ्यांच्या पेहरावातील तरुणाई हे मुख्य आकर्षण असतील. दरम्यान, देशाच्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मराठमोळ्या पोषाखात मोठी बाइक रॅलीही काढण्यात येणार आहे. कॉटनग्रीन पूर्वेकडील फेरबंदर परिसरातून शोभायात्रेला सुरुवात होईल. पुढे अंजीरवाडीतून माझगावच्या महाराणा प्रताप चौकातून ताडवाडीच्या श्री गणेश मैदानात दुपारी १२.३० वाजता शोभायात्रेची सांगता होणार आहे. गिरणगावातील ही शोभायात्रा यशस्वी होण्यासाठी भायखळा, माझगाव, कॉटनग्रीन, रे रोड, डॉकयार्ड रोड परिसरातील तब्बल ६३ स्थानिक संस्था आणि मंडळे एकत्रित आली आहेत. धारावीतही गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेची धामधूम असेल. येथील महाराष्ट्र सांस्कृतिक उत्सव मंडळाने सकाळी ९ वाजता आयोजित केलेल्या शोभायात्रेत ५० स्थानिक सार्वजनिक मंडळे सहभागी होणार आहेत. या सोहळ्यामध्ये पारंपरिक वेशभूषा, तरुणाईचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक, झांज पथक, टाळ-मृदुंगाचा घणघणाट आणि धारावीच्या गणेश मंदिर विद्यार्थ्यांचा सामाजिक संदेश देणाऱ्या चित्ररथाचा समावेश असेल. शोभायात्रेतील या चित्ररथातून ‘झाडे लावा’, ‘पाणी वाचवा’, ‘स्वच्छ भारत अभियान’ असे पर्यावरणपूरक संदेश देण्यात येणार आहेत. तर धारावी पोलिसांतर्फे शोभायात्रेत गुलाबाची फुले आणि अल्पोपाहार देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शोभायात्रेची सुरुवात धारावीतील धारेश्वर शिवमंदिर येथून होणार असून पुढे संत कक्कया मार्ग, ९० फिट रोड , संत रोहिदास मार्ग, धारावी कोळीवाडा असे मार्गक्रमण करत संत कक्कया मार्गावरील नवीन चाळ (शिवमंदिर) येथे शोभायात्रेचा सांगता सोहळा संपन्न होणार आहे.गोराईमध्ये होणार नववर्षाचा जल्लोषबोरीवली येथील गोराई परिसरामध्येही नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कोणतेही प्रायोजकत्व न घेता स्वयम् युवा प्रतिष्ठान आणि आम्ही मावळे यांच्या संयुक्त विद्यमानाने सलग ८व्या वर्षी ही शोभायात्रा आयोजित करण्यात येत आहे. या शोभायात्रेत सर्व तरुणाई व नागरिक पारंपारिक वेशभूषेत सहभागी होणार असून परिसरातील प्रगती शाळेचे लेझीमपथक यावेळी विशेष प्रात्यक्षिके सादर करतील. त्याचप्रमाणे ध्वजपथक आणि ढोलपथक यांचे एकत्रित सादरीकरण या शोभायात्रेचे विशेष आकर्षण असेल. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता साईमंदिर (गोराई खाडी) येथून सुरुवात होणारी ही शोभायात्रा, प्रगती शाळेमध्ये समाप्त होईल. दादरमध्ये स्त्रीभ्रूणहत्येविरोधात जनजागृतीदादरमधील शोभायात्रेत यंदा ‘स्त्रीभ्रूणहत्या आणि महिला सक्षमीकरण’ ही थीम दिसेल. या शोभायात्रेत स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे शिवाजी पार्क परिसरात चित्ररथावर लाइव्ह मल्लखांब केले जाईल. शिवाजी महाराजांचे आरमार या चित्ररथ यात्रेतील प्रमुख आकर्षण असेल. ढोलताशा पथक, महिला आणि पुरुषांचे लेझीम पथक, मर्दानी खेळ, बाइक रॅलीद्वारे महिला जनजागृती अशी विविध आकर्षणे या शोभायात्रेत पाहता येतील. चैत्र नवरात्रीनिमित्ताने शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिलांमधील ९ भाग्यवान महिलांना लकी ड्रॉद्वारे पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. दादर पूर्वेकडील शिंदेवाडी येथील भवानीमाता पटांगणावरून सकाळी ९ वाजता शोभायात्रेला सुरुवात होईल.घोडपदेवमध्ये आज रंगणार पालखी सोहळागुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवारी सायंकाळी भायखळा पूर्वेकडील घोडपदेव परिसरात मराठमोळ्या पालखी सोहळ्याची रंगत पाहता येणार आहे. येथील ग्रामदैवत श्री कापरेश्वर महाराज यांच्या उत्सवाची सांगता गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवारी थाटामाटत होईल.दरम्यान, आठवडाभर सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता रविवारी रात्री झाली. या सप्ताहाच्या निमित्ताने विभागात जत्रोत्सवाचे आयोजन केलेले आहे. तरी पालखी सोहळ्यात ढोल-ताशासह लेझीम, टाळ-मृदुंग आणि अभंगांची मेजवानी  असेल .