Join us

बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गणेश चतुर्थीला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गणेश चतुर्थीला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती मंडपाच्या दिशेने रवाना होतील. तत्पूर्वी अंतिम टप्प्यातील खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांनी बाजारात धाव घेतल्याने तुडुंब गर्दी झाल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले.

गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सण. विशेषतः मुंबईत सार्वजनिक स्तरावर त्याचे स्वरूप मोठे असते. या दिवसांत मुंबई आणि परिसराचे रूप बदलले दिसून येते. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी ओसरली की गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गणेशपूजन करणारे भक्त बाजारात गर्दी करतात. बुधवारी अशीच गर्दी मुंबईतील प्रमुख बाजारपेठांसह लहान-मोठ्या मार्केटमध्येही दिसून आली.

बाप्पाचे अलंकार आणि आभूषणांची खरेदी काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली असली तरी, हार-फुलांसह देवसामान घेण्यासाठी मुंबईकर घराबाहेर पडले. दादरमधील फुलांच्या बाजारात सकाळपासूनच गर्दीचा ओघ सुरू होता. विशेषतः झेंडूच्या फुलांना सर्वाधिक उठाव होता. शिवाय मखर सजावटीसाठी विविधरंगी फुलांनाही मागणी होती. शेवंती, अष्टर, गुलाब आणि लीलीच्या फुलांची आवकही मोठ्या प्रमाणात झालेली दिसून आली.

पुढील काही दिवसांकरिता लागणारा भाजीपाला घेण्यासाठीही गृहिणींची लगबग होती. मोदकासाठी सुके खोबरे, गूळ खरेदी करण्याकरिता काही जण खास आले होते. दादरच्या बाजारातील अरुंद गल्ल्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात असल्याने गर्दी नियंत्रित करताना पोलिसांच्या नाकीनव येत होते. अंतर नियम पाळण्याच्या सूचना केल्या जात होत्या. परंतु, बाजारात उसळलेल्या गर्दीवर त्याचा कोणताही परिणाम होताना दिसत नव्हता. लालबागसह मस्जिद बंदर, भेंडीबाजार, भायखळा मार्केट आणि स्थानिक बाजारपेठांमध्येही गर्दी पहावयास मिळाली.

......

मखर, तोरणे, एलईडी लाईट्सला मागणी

- सार्वजनिक मंडळांची तयारी पूर्ण झाली असली तरी घरगुती गणेशपूजन करणारे मात्र आधी २ दिवस तयारी सुरू करतात. बुधवारच्या गर्दीत अशा गणेशभक्तांची संख्या सर्वाधिक होती.

- त्यांनी सर्वात आधी गाठले ते मखराचे दुकान. घरात उपलब्ध जागेत उठून दिसणारा मखर खरेदी करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. पर्यावरणपूरक मखर १५०० ते १० हजारांच्या घरात विकले जात होते.

- त्याशिवाय विविधरंगी तोरणे, माळा आणि शोभेच्या वस्तू घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली दिसून आली. दरवर्षीप्रमाणे तोलून-मापून भाव करायला न मिळाल्याने काहीजण नाराजही झाले.

- एलईडी लाईट्सच्या दुकानांबाहेरही मोठी गर्दी होती. बाप्पाच्या गाभाऱ्यात विद्युत रोषणाईसाठी लाईट्स खरेदी करण्याकडे तरुणवर्गाचा कल दिसून आला.