मुंबई : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी १६ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता ‘एक किसान... लाख किसान...’ अशी घोषणा देत किसान अलायन्स मोर्चाच्या वतीने मरीन लाईन्स स्थानक पश्चिम ते आझाद मैदानदरम्यान लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. यात हजारोंच्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर उतरणार आहेत, अशी माहिती किसान अलायन्स मोर्चाकडून देण्यात आली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील शंभरहून अधिक संघटनांनी एकत्र येऊन किसान अलायन्स मोर्चाची स्थापना केली आहे.
केंद्र सरकारने तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समित्यांची व्यवस्था कायम ठेवावी. या बाजार समित्यांमधील व्यवहार पारदर्शी होतील, अशी व्यवस्था निर्माण करावी. शेतकऱ्यांना माफक दरात बी-बियाणे व खते यांचा पुरवठा करण्याची व्यवस्था करावी. शेतकऱ्यांच्या सर्व मालाला किमान आधारभूत किंमत मिळेल, अशी कायदेशीर तरतूद करून तिचे काटेकोर पालन करण्यात यावे. शेतमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देण्यासह स्वामीनाथन कमिशनच्या सर्व शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, अशा मागण्या किसान अलायन्स मोर्चाकडून करण्यात आल्या आहेत.