Join us

मुंबईकर मतदारांनो, प्रलोभनांना बळी पडू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:45 AM

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत फिरला चित्ररथ

मुंबई : मद्य, बिर्यानी, गुलाबी नोट या प्रलोभनांना बळी पडू नका, असा संदेश लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर मतदारांना देण्यात आला. सद्भावना संघ जागृत नागरिक संघटना, एरिया सभा समर्थन मंच, सर्व सेवा संघ, जनआंदोलन का राष्ट्रीय समन्वय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत ‘जागृत नागरिक मताधिकार अभियान’ राबविण्यात आले. त्यानिमित्त ‘मी मत विकणार नाही’ अशी शपथही घेण्यात आली.४ एप्रिल रोजी सुरू झालेल्या या अभियानाची २५ एप्रिल रोजी दादर रेल्वे स्थानकाबाहेर सांगता झाली. या वेळी ‘मद्य, बिर्यानी, गुलाबी नोट या प्रलोभनांना बळी पडणार नाही; मी मत विकणार नाही!’ असे आवाहन करणारा चित्ररथ नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. हा चित्ररथ दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य, मुंबई उत्तर, उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य या सहा मतदारसंघांत फिरवून मतदानाबाबत जनजागृती केली जात होती. मूलभूत मुद्द्यांवरून निवडणूक भरकटली आहे. काही पक्ष सोडले तर विभागात इतर कोण उभे आहेत? याची माहिती कळत नाही, असा सूर ज्येष्ठ नागरिकांनी आळवला.दुसरीकडे पक्षाने ५० टक्के महिलांना उमेदवारी दिली नाही, हा राग महिलांच्या मनात होता. युवकांचा रोष तर सर्वच पक्षांवर दिसून आला. रोजगार नाही, दोन लाख शाळा देशभरात बंद झाल्या, शिक्षण महाग झाले; पण एकाही पक्षाच्या उमेदवाराने हे मुद्दे मांडले नाहीत, असे अनुभव मुंबई शहर आणि उपनगरातून मतदारांनी सांगितल्याचे अभियानातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.मतदारांना प्रशिक्षित करण्याची गरजजागृत नागरिक मताधिकार अभियानाच्या संयोजक वर्षा विलास म्हणाल्या की, चित्ररथ मुंबईत फिरत असताना असे जाणवले की, अजूनही मतदारांमध्ये प्रगल्भता आलेली नाही. खासदाराची कामे कोणती? याबाबत मतदारांना माहितीच नाही.येणाºया काळात लोकशाही सक्षमीकरणासाठी देशाचा मालक असलेल्या मतदाराला प्रशिक्षित करावे लागेल. जर धर्माचा राजकीय बाजार थांबवायचा असेल, तर जागृत मतदारांच्या लोकशिक्षणाची चळवळ उभी करावी लागेल.

टॅग्स :लोकसभा निवडणूकमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019