मुंबईकर होणार ‘योगोत्सवा’शी एकरूप
By admin | Published: June 21, 2016 03:01 AM2016-06-21T03:01:34+5:302016-06-21T03:01:34+5:30
धकाधकीच्या आयुष्यात सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण त्यासाठी नवीन व्यायाम प्रकार करण्यापेक्षा पारंपरिक योगसाधना केल्यास त्याचा अधिक फायदा होतो.
टीम लोकमत, मुंबई
धकाधकीच्या आयुष्यात सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण त्यासाठी नवीन व्यायाम प्रकार करण्यापेक्षा पारंपरिक योगसाधना केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. योगसाधनेला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यात भारताने पुढाकार घेतला होता. भारताच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करायला गेल्या वर्षी सुरुवात झाली. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी मुंबईकरही सज्ज झाले आहेत. मुंबईत अनेक सामाजिक संस्थांनी विविध ठिकाणी योग दिनानिमित्त योगासनांचे, चर्चासत्रांचे आयोजन केले आहे.
महापालिकेच्या कूपर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळी १० वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. योगसाधनेचे शरीराला होणारे फायदे, गर्भवती महिलांना योगसाधनेचे होणारे फायदे याविषयी रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. गर्भवती महिलांनी योग्य मार्गदर्शनाखाली योगसाधना केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. याविषयी प्रामुख्याने जनजागृती करण्यात आली. योग दिनी गर्भवती महिलांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन कूपर रुग्णालयात सकाळी साडेदहा वाजता करण्यात आले आहे.
आर्ट आॅफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या योग शिबिरांत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत तर स्वामी पूर्णचैतन्य हे मुंबईत शिबिर घेणार आहेत. कांदिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ८ हजार तर कार्टर रोड येथील कार्यक्रमात १ हजार व्यक्ती सहभागी होणार आहेत. नवी मुंबई येथील शिबिरात ५ हजार व्यक्ती सहभागी होणार आहेत.
३१० गावांत साजरा होणार योग दिन!
१मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या राज्यातील ३१० गावांमध्ये मंगळवारी, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून १५ ते २१ जून या आठवड्यात २१० विद्यार्थ्यांसाठी विशेष योग शिबिराचे आयोजनही केले आहे.
२आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाने कैवल्यधाम यांच्या संयुक्त विद्यमाने, विद्यानगरी येथील क्रीडा संकुलात योग शिबिराचे आयोजन केले आहे. विद्यानगरीमध्ये आयोजित या कार्यक्रमात प्रशिक्षित शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे योग प्रात्यक्षिक अनुभवयाला मिळणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती विद्यासागर राव हे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
३या आधी विद्यापीठाने २३ ते २९ मे २०१६ या कालावधीत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील १०० शिक्षकांना एक आठवड्याचे योग प्रशिक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येक महाविद्यालयामध्ये ३ दिवसांचे योग प्रशिक्षण देण्यात येत आहे.
विनामूल्य योग शिबिर
दादर येथील स्विम योगा संस्थेतर्फे विनामूल्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी योगाचे महत्त्व आणि योगासने करून घेतली जाणार आहेत. हे शिबिर प्रमोद महाजन उद्यान, तुलसी पाइप रोड येथे सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
४०० पोलिसांसोबत योग
मुंबई भारतीय जनता पक्षातर्फे ४०० पोलिसांसोबत योगा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा फिटनेस राखला जावा यासाठी या विशेष योगवर्गाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ७ वाजता प्रोमोनाड, १५० फूट झेंड्याचा परिसर,
वांद्रे (प.) येथे होणार आहे. या वेळी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, महापालिका आयुक्त अजय मेहता, दिग्दर्शक मधुर भांडारकर, अभिनेत्री रवीना टंडन उपस्थित राहणार आहेत.
मुंबई योगा फेस्ट
शम्मीज योगालय फाउंडेशनच्या वतीने नेहरू सेंटर, वरळी आणि आरसिटी मॉल घाटकोपर येथे योगवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथे सकाळी ७ वाजता तर आरसिटी येथे सकाळी ६ वाजता योगवर्गाला सुरुवात होईल.
आयडॉलतर्फे योगवर्ग
‘फिटनेस’ राखण्यासाठी योग महत्त्वाचा असून मुंबई विद्यापीठाचा आयडॉल विभाग आणि लायन्स क्लब इंडियातर्फे योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दुपारी ३ ते ४ या वेळेत मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल खोली क्रमांक १०३ येथे होईल.
पालिका विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण
महापालिकेचा शारीरिक शिक्षण विभाग व ईशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्रशिक्षणाद्वारे महापालिकेच्या शाळांतील सुमारे १ लाख विद्यार्थ्यांना विविध केंद्रांमध्ये २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनी योग प्रशिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. महापालिकेच्या २६० क्रीडा संकुलांमधून ७ हजार १९७ शिक्षक व १ हजार ४०५ शिक्षकेतर कर्मचारी आणि ईशा फाउंडेशनचे सुमारे ४०० स्वयंसेवक या योग प्रशिक्षणाचे समन्वयन साधणार आहेत. दरम्यान, गुरुवारसह शुक्रवारी ७५० शिक्षकांना योग प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षित शिक्षक शालेय विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण देणार आहेत. सोबतच व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे ३९० शाळांतही योग प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राजभवनात इशा फाउंडेशन, ब्रह्मकुमारीज आणि कैवल्यधाम या संस्थांतर्फे योग दिनाचे आयोजन केले आहे. सकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपाल विद्यासागर राव सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर सकाळी नऊ वाजता मुंबई विद्यापीठाद्वारे आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमातही राज्यपाल सहभागी होणार आहेत. कैवल्यधाम आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने विद्यानगरीतल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अतिस्थूल व्यक्तींसाठीही योग उपयुक्त
अतिस्थूल व्यक्तींना वजन कमी करण्यासाठी योग हा उत्तम मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. योग दिनाचे औचित्य साधून ‘जेटी ओबेसिटी सोल्युशन्स’ने योग प्रशिक्षणाच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला ६० हून अधिक अतिस्थूल व्यक्ती, रुग्णालयाचे कर्मचारी, परिचारिका यांनी उपस्थिती लावली होती. डॉ. एल.एच. हिरानंदानी रुग्णालयात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. लठ्ठपणा शल्यचिकित्सक डॉ. जयश्री तोडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्राणायाम शिबिर
आत्मबोध अॅकॅडमी आॅफ योगा आयुर्वेद नॅचरोपथी हेल्थ सायंटिफीक रिसर्च सेंटरतर्फे सकाळी साडेसहा वाजता बिर्ला मातोश्रीजवळील ‘द बॉम्बे सिटी अॅम्ब्युलन्स कॉर्प्स’ येथे प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी साडेसहा वाजता पाठीच्या दुखण्यावर उपयुक्त योगासनांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
योगवर्ग आणि मोफत आरोग्य तपासणी
सांताक्रूझ येथील द योगा इन्स्टिट्यूटतर्फे मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय जागतिक योग दिवसाचे औचित्य साधत या वेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरदेखील होणार आहे. योग शिबिर द योगा इन्स्टिट्यूट, प्रभात कॉलनी, सांताक्रूझ (प.) येथे सकाळी ९.३० वाजल्यापासून होणार आहे, तर आरोग्य तपासणी सकाळी १०.३० वाजल्यापासून सुरू होईल.
योग शिबिर
मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पतंजली योग समितीतर्फे भारताचे प्रवेशद्वार गेट वे आॅफ इंडिया येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे.