बेस्टच्या खटारा बस जाणार ताफ्याबाहेर; मुंबईकरांना चांगल्या गाड्या पुरविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 12:33 PM2023-06-09T12:33:10+5:302023-06-09T12:33:42+5:30
फुटलेल्या काचा, तुटलेल्या सीट्स अशा भंगार, नादुरुस्त बसमधून मुंबईकरांना प्रवास करावा लागतोय.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: फुटलेल्या काचा, तुटलेल्या सीट्स अशा भंगार, नादुरुस्त बसमधून मुंबईकरांना प्रवास करावा लागतोय. या बसची व्यथा ‘लोकमत’ने गुरुवारी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत खटारा, जुनाट बसेस लवकरच बदलण्यात येतील व मुंबईकरांना चांगल्या बसेस पुरवल्या जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईकरांना आरामदायी आणि सुखकर प्रवासाची अनुभूती देणाऱ्या बेस्ट बसची अवस्था बिकट आहे. मोडलेल्या काचा, तुटलेल्या सीट्स आणि वारंवार बंद पडणाऱ्या बसमधून मुंबईकरांना प्रवास करावा लागत आहे.
कधी एसी बंद तर कधी दरवाजे उघडत नसल्याच्या तक्रारी बेस्ट उपक्रमाकडे प्रवाशांकडून केल्या जात आहेत. बेस्ट उपक्रमाला नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरील यूआयटीपी पुरस्कार देण्यात आला असून, त्याची वाहवा सर्वत्र होत आहे. मात्र, आयुमर्यादा संपलेल्या बस व अचानक वाटेत बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे मुंबईकर मात्र बेस्टच्या नावाने शिमगा करत आहेत.
मुंबईकर प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी बेस्ट आपल्या ताफ्यात नवीन गाड्या उतरवणार असून, जुन्या गाड्या सेवेतून काढून टाकणार आहे. प्रवाशांच्या तक्रारीनंतर तत्काळ या गाड्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. लवकरच एसी गाड्या मुंबईकरांच्या दिमतीला आणणार असल्याची माहिती बेस्टच्या एका अधिकाऱ्याने दिली.