मुंबई : बॉक्सिंग हा ताकद आणि बुद्धीचा खेळ. यात प्राविण्य मिळवण्यासाठी आयुष्याची कित्येक वर्षे खर्ची घालावी लागतात. त्यानंतरच एखादा खेळाडू यात पारंगत होतो. मात्र, कांदिवलीतील चाळीत राहणाऱ्या तरुणाने अवघ्या काही महिन्यांच्या सरावानंतर एका मिनिटात ४३४ स्ट्रेट पंच मारून बॉक्सिंगमध्ये विश्वविक्रम केला आहे. आशिष रजक असे या तरुणाचे नाव आहे.
आशिष हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर हे त्याचे मूळ गाव. सध्या कांदिवलीतील शिवनेरी चाळीत तो आई-वडिलांसोबत राहतो. घरात खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आशिषने हे यश मिळवले आहे. आपल्या विश्वविक्रमाबाबत ‘लोकमत‘ला सांगितले की, लहानपणापासूनच मला काहीतरी जगावेगळे करण्याची इच्छा होती. पण काय करावे हे समजत नव्हते. थोडा मोठा झाल्यावर मार्शल आर्ट करण्याची इच्छा मनात आली. त्यामुळे तिथे प्रवेश घेतला. गेल्या ४ वर्षांपासून मी मार्शल आर्ट शिकत आहे. यादरम्यान प्रशिक्षक मनोज गौंड यांनी मला स्ट्रेट पंचवर भर देण्याची सूचना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर मेहनत केली आणि यशाला गवसणी घातली.
माझ्या या यशाचे श्रेय पूर्णतः माझे आई-वडील आणि सर्व प्रशिक्षकांना जाते. लहानपणापासूनच जगावेगळे काहीतरी करण्याची इच्छा होती. देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत असल्याने मेहनतीचे फळ मिळाल्याचे समाधान वाटते आहे. - आशिष रजक
याआधीचा विक्रम...१८ वर्षांखालील गटाचा विचार करता याआधी एका मिनिटांत ३३४ स्ट्रेट पंच मारण्याच्या विक्रमाची गिनिज बूकमध्ये नोंद होती. मात्र, आशिषने एका मिनिटांत तब्बल ४३४ स्ट्रेट पंच मारत नवा विक्रम प्रस्थापीत केला आहे. याविषयी विचारले असता त्याने सांगितले की, प्रशिक्षकांनी ४५० चे टार्गेट दिले होते. इतके पंच बसले असते तर अन्य कोणी सहजासहजी हा विक्रम मोडू शकला नसता. मात्र, ४३४ पंचचा विक्रम मोडणेही एखाद्याला सहसा शक्य होणार नाही.