मुंबई - बेस्ट कर्मचा-यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुस-या दिवशीही मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने सकाळपासून एकूण ७६ जादा एसटी बसेस सोडल्या होत्या. सायंकाळपर्यंत या बसेसने दीडशेहून अधिक फेºया पूर्ण करत प्रवासी वाहतुकीवर ताण कमी करण्याचा प्रयत्न केला.
संपाच्या पहिल्याच दिवशी सकाळी एसटी प्रशासनाने सुरूवातीला ४० बसेस सोडत मुंबईकरांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मिळालेल्या प्रतिसादानंतर एसटीने दुपारनंतर एकूण ५५ जादा बसेस सोडल्या होत्या. या बसेसने सायंकाळी ६ वाजेपर्यंततब्बल १२३ फेºया पूर्ण केल्या होत्या. मुंबईकरांच्या वाढती मागणीला पूर्ण करण्यासाठी एसटी प्रशासनाने बुधवारी तब्बल ७६ एसटी बसेस मुंबईकरांच्या सेवेसाठी सोडल्या. त्यात कुर्ला पूर्वेकडून माहूल आणि कुर्ला पश्चिमेकडून वांद्रेपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना प्रत्येकी ८ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तर घाटकोपर ते माहूल प्रवासासाठी एसटीच्या तीन बसेस धावत होत्या. कुर्ला पश्चिमेकडून सांताक्रूझ, तर अंधेरी पूर्वेकडून स्पेस आणि दादरहून मंत्रालयाला जाणाºया प्रवाशांसाठी प्रशासनाने प्रत्येकी ५ बसेस सोडल्या होत्या. बोरिवली ते सायन गाठण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने २ एसटी बसेसची व्यवस्था केली होती.
ठाण्याहून मुंबईकडे मोठ्या संख्येने प्रवास करणाºया प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने तब्बल १५ बसेस सोडल्या होत्या. नवी मुंबईकरांना मुंबई गाठताना समस्या येऊ नये, म्हणून प्रशासनाने पनवेल ते मंत्रालय प्रवासासाठी ५ बसेसची व्यवस्था केली होती. याउलट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मंत्रालय आणि कुलाबा गाठण्यासाठी एसटी प्रशासनाने प्रवाशांसाठी प्रत्येकी १० बसेस तैनात केल्या होत्या. अशाप्रकारे एकूण ७६ बसेसने दीडशेहून अधिक फेºया पूर्ण करत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.