Join us

मुंबईकरांना जलदिलासा... चार तलाव झाले ओव्हर फ्लो; पाणीपातळी ६८ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 7:03 AM

पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय पुढील महिन्यात

मुंबई :  पावसाच्या संततधारेमुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता दूर होण्याची चिन्हे आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. गुरुवारी रात्री मोडक सागर तलाव भरून वाहू लागला. सध्या मुंबईत दहा टक्के पाणीकपात सुरू आहे. पाणीकपात मागे घेण्याबाबतचा निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.

जूनचा निम्मा महिना कोरडा गेल्यानंतर मुंबईत दहा टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रावर पावसाने कृपादृष्टी दाखवली आहे.  सातपैकी चार तलाव ओसंडून वाहू लागले असून तलावांची पाणीपातळी ६८ टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आहे.  

मोडक सागर तलावाची कमाल पाणी साठवण ही १२,८९२.५ कोटी लिटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) असून गेल्या वर्षी  हा तलाव १३ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. २०२१ मध्ये २२ जुलै रोजी, २०२० मध्ये १८ ऑगस्टला, २०१९ मध्ये २६ जुलै रोजी भरुन वाहू लागला होता, तर २०१८ आणि २०१७ अशी दोन्ही वर्षे हा तलाव १५ जुलै रोजी भरून वाहू लागला होता. 

दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा कमीच 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही १४,४७,३६३ दशलक्ष लिटर आहे. २८ जुलै रोजी सातही तलावांमध्ये सध्या ९,८५,१३० दशलक्ष लिटर म्हणजेच ६८.०६ टक्के एवढा पाणीसाठा आहे. 

मात्र, हा पाणीसाठा मागील दोन वर्षांच्या २८ जुलै रोजीच्या तुलनेत कमीच आहे. २०२२ मध्ये हा पाणीसाठा ८८ टक्क्यांवर, तर २०२१ मध्ये हा पाणीसाठा ७० टक्के होता.

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

तलाव       २०२३    २०२२अप्पर वैतरणा     ९७१४१    १८२९४१मोडक सागर     १२८९२५    १२८९२५तानसा     १४४४७५    १४३५३४मध्य वैतरणा     १५४२४९    १८४११०भातसा     ४२४५९६    ६०७१८६विहार     २७६९८    २१३७४तुळशी     ८०४६    ८०४६

टॅग्स :मुंबईपाऊस