मुंबईकर कामाने नाहीत, पण वाहतूक काेंडीमुळे थकतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:06 AM2021-03-14T04:06:21+5:302021-03-14T04:06:21+5:30
रिंपल सांचला : रखडलेली रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठीच ‘राेड मार्च’ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत वाहतूक कोंडीने नाकीनऊ ...
रिंपल सांचला : रखडलेली रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठीच ‘राेड मार्च’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत वाहतूक कोंडीने नाकीनऊ आणले असून, त्यामुळे इंधन जळते. पर्यावरणाची हानी होते. वाहनांत बसून पाठ दुखते, आरोग्य बिघडते. वेळ वाया जातो. परिणामी मुंबईकर एकवेळ कामाने थकणार नाही, पण वाहतूक काेंडीमुळे थकेल, अशी अवस्था आहे. धूळ, माती उडत आहे. प्रदूषण होत आहे. अशावेळी ‘रोड मार्च’ या आंदोलनाच्या दबाव तंत्रामुळे का होईना, मुंबई पालिकेच्या तीन विकास आराखड्यांतील रस्ते प्रत्यक्षात उतरले तर नक्कीच मुंबईकरांचा वेळ वाचेल. आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईचा चेहरामोहरा बदलेल, असा आशावाद रोड मार्चच्या कार्यकर्त्या रिंपल सांचला यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.
रोड मार्च नक्की काय करणार आहे?
मुंबईच्या तीन विकास आराखड्यात जे रस्ते दाखविले आहेत ते १९५४ पासून बनविलेले नाहीत. १९६७ सालच्या विकास आराखड्यापासून ही अडचण आहे. या रस्त्यांचे काम सुरू व्हावे यासाठी आम्ही रोड मार्च नावाचे आंदोलन पुकारले आहे. मुळात या गोष्टी लोकांना माहितीच नाहीत. आम्ही रोड मार्चच्या माध्यमातून यावर प्रकाश टाकत आहोत. जेव्हा खूप लोक एकत्र येतील तेव्हा कुठे महापालिकेवर दबाव येईल आणि काम सुरू होईल.
मुंबईच्या रस्त्यांबाबत काय अडचणी आहेत?
मुंबई खूप मोठी आणि रस्ते छोटे आहेत. मात्र बहुतांश ताण हा एस.व्ही. रोड, लिंक रोड, हायवेवर येतो. त्यात कुठे मेट्रोचे, कुठे विजेचे तर कुठे महापालिकेचे काम सुरू आहे. परिणामी मुंबईकरांसाठी रस्तेच उरले नाहीत. जे आहेत ते खड्ड्यांत आहेत. आहे त्या रस्त्यांवर ताण येऊ नये आणि मुंबईकरांना रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी रोड मार्च नावाचे आंदोलन हाती घेतले आहे.
सरकार आणि महापालिकेने काय करावे?
मुंबईच्या विकास आराखड्यात प्रस्तावित रस्ते प्रत्यक्षात उतरावेत यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने काम करावे एवढीच अपेक्षा आहे. रस्ते बनविताना पैसेवाल्यांसाठी चांगले रस्ते आणि गरिबांसाठी वाईट रस्ते असे काम नको. असे रस्ते बनवा की एकदा ताे बनवल्यानंतर पुढील ५० वर्षे पुन्हा बनविण्याची गरज नाही. मात्र आपल्याकडे रोज एक रस्ता खोदला जातो.
मुंबईकरांकडून काय अपेक्षित आहे?
नगरसेवक, आमदार, खासदारांनी आपल्या परिसरातील रस्त्यांची कामे सुरू करावीत. राज्य सरकार, महापालिका, वनविभाग किंवा तत्सम विभागांनी समन्वय साधणे गरजेचे आहे. कागदाेपत्री तरी काम सुरू झाले पाहिजे. सर्वसामान्य नागरिक आमच्या सोबत आहेत. त्यांच्या पाठिंब्याची आणखी गरज आहे. आमची चळवळ ही सर्वसामान्य माणसाची, मुंबईकरांची चळवळ आहे.
.............................