मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील मळभ हटल्यानंतर आता मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले असून, उत्तरोत्तर कमाल तापमानाचा पारा वरचढच होत चालला आहे. परिणामी, मुंबईकरांना वाढता उन्हाळा असह्य होत असून, रात्रीच्या उकाड्यातही वाढ होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुंबई तापत असतानाच हवामान खात्याने राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार, २४ मार्च रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ मार्च रोजी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २६ मार्च रोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ मार्च रोजी गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान भिरा येथे ३९, तर सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १२.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मागील २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. शनिवारसह रविवारी मुंबईचे आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २३ अंशाच्या आसपास राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबईकरांना उकाडा असह्य, राज्याला पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:43 AM