लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दूषित पाण्यामुळे होणारा गॅस्ट्राे हा आजार असून, यामुळे रुग्णांना पोटाच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. अनेक रुग्णांना हा त्रास गंभीर झाल्यानंतर लक्षात येते. अनेक रुग्णांना या आजारामुळे पोटदुखी होत असून, त्याकडे योग्यवेळी लक्ष न दिल्याने हा आजार बळावतो. अतिसार, भूक न लागणे किंवा मळमळ होत असल्याच्या समस्या जाणवल्यानंतर नागरिक डॉक्टरांकडे धाव घेतात. मात्र एकंदरच उघड्यावरील आणि रस्त्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात संसर्ग होऊन हा आजार वाढत असल्याचे सांगून मुंबईकरांचे पोट बिघडत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या सहा महिन्यांत ६,६७७ गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले असून, अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे.
बहुतांश मुंबईकर हे रस्त्यावरचे पदार्थ रोज खातात. यामध्ये अनेकवेळा स्वच्छतेचा अभाव असतो. माशा त्या पदार्थाच्या ठिकाणी घोंगावत असतात. तसेच उन्हाळ्यात विशेषकरून जी काही शीतपेये विकली जातात त्यात जे पाणी वापरले जाते ते कुठून आणले जाते हे अनेकांना माहीत नसते. ते पाणी दूषित असेल तर त्या पेयाद्वारे पोटाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अनेकवेळा डॉक्टर बाहेरचे पदार्थ आणि शीतपेये पिऊ नये असा सल्ला देतात. रुग्णांना अनेकवेळा अशक्तपणा आल्याने डॉक्टर त्यांना ओआरएस देतात. या आजारात अनेकवेळा रुग्णांना जुलाब, उलट्या होतात. त्यामुळे रुग्णाचे अंग एकदम गळून पडते आणि त्यामुळे रुग्ण घाबरून जातो.
सहा महिन्यांतील गॅस्ट्रोचे रुग्ण- ६,६७७
लक्षणे- पोट फुगणे, उलट्या होणे, अशक्तपणा येणे, भूक न लागणे, अतिसार, चक्कर येणे.
पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर काही प्रमाणात दूषित पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दूषित पाण्यामुळे शक्यतो गॅस्ट्रोसारखा आजार रुग्णांना होतो. त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच असे रुग्ण दिसण्यास सुरुवात होते. सध्या ओपीडीमध्ये रोज या आजराचे रुग्ण आम्ही पाहतो. त्यामुळे नागरिकांनी या काळात पाणी उकळून प्यावे. गरम पदार्थ खावेत. -डॉ. अविनाश सुपे, पोटविकार तज्ज्ञ, हिंदुजा रुग्णालय.