मुंबईकरांनो, बाप्पांच्या विसर्जनादरम्यान या मार्गावरून जाणे टाळा, ७४ रस्ते बंद
By मनीषा म्हात्रे | Published: September 8, 2022 08:58 PM2022-09-08T20:58:32+5:302022-09-08T21:00:07+5:30
विसर्जन स्थळांवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून पोलिसांसह अनेक स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत मिळणार आहे.
मुंबईः कोरोना नंतर सर्वत्र जल्लोषात साजरा होणाऱ्या गणेशोत्सव विर्सजन काळात शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुबई पोलिसांबरोबर वाहतूक पोलीस सज्ज आहेत. गणपती विसर्जनाला सकाळी १०.०० वा. ते दुसऱ्या दिवशी पहाटे ०६.०० वाजेपर्यंत ७४ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. एकूण ५४ रस्ते एक दिशा मार्ग करण्यात आलेले आहेत. तसेच ५७ रस्ते मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेले आहेत. याशिवाय ११४ ठिकाणी नो पार्किंग घोषित करण्यात आलेली आहे.
विसर्जन स्थळांवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून पोलिसांसह अनेक स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत मिळणार आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन आणि गणेश घाट पवई यासारख्या महत्वाच्या विसर्जनाच्या ठिकाणी मुंबई शहर वाहतुक पोलीसांचे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. गणेश विसर्जनाच्या दरम्यान वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी निरिक्षण मनोरे उभे करण्यात आले आहेत. विसर्जन दरम्यान वाहने बंद पडून अथवा विसर्जनाच्या मार्गात अडथळा दुर करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस विभाग , मुंबई महानगरपालिका यांच्याकडून लहान व मोठ्या क्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. साध्या गणवेशातील पोलीस गर्दीत सहभागी होत सर्व हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.
पोलीस बंदोबस्त
मुंबई पोलस दलातील ३ हजार २०० अधिकारी, १५ हजार ५०० कर्मचारी आणि जवानांच्या दिमतीला केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या ८ तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथक, शिघ्रकृती दल,१ फोर्सवन, ७५० होमगार्ड, २५० प्रशिक्षणार्थी आणि सिव्हील डिफेन्स तैनात ठेवण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.