लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इस्रोच्या चंद्रयान ३ मोहिमेने चंद्राला गवसणी घातली असून या चंद्रयान मोहिमेची भुरळ बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही पडली. कचऱ्यात टाकलेले डबे, नादुरुस्त पाइप, स्ट्रीट लाइटचे खांब, बसचे पत्रे या टाकाऊ साहित्यातून बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी चंद्रयानाची प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीची माहिती मुंबईकरांनी मोठ्या कुतूहलाने जाणून घेतली.
बेस्टच्या आणिक आगारातील वस्तू संग्रहालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली होती. प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच दादर येथील बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्यापासून चांद्रयान तयार केले.
आठ ते १० टाकाऊ वस्तूंच्या माध्यमातून बेस्टच्या चार कर्मचाऱ्यानी इस्रोचे रॉकेट तयार केले. दादर वर्कशॉप येथे हे रॉकेट तयार करण्यात आले असून त्यासाठी एकही रुपया खर्च आलेला नाही, अशी माहिती या कर्मचाऱ्यांनी दिली. हे रॉकेट तयार करण्यामागे अनिल तांबे यांची मूळ संकल्पना होती. त्यासाठी संदीप इंदलकर, रमेश जाधव आणि संजय वाकचौरे यांनीही विशेष मेहनत घेतली.
हा प्रकल्प पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकालाच या कर्मचाऱ्यांकडून माहिती दिली जात असे. प्रदर्शनादरम्यान सुमारे तीन हजार लोकांनी तयार करण्यात आलेल्या चंद्रयानबाबत माहिती जाणून घेतली, अशी माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली.
बेस्टकडून दरवर्षी प्रदर्शन भरविले जाते. यंदाच्या प्रदर्शनात नावीन्यपूर्ण व हटके काही तरी तयार करायचे असे आधीच ठरविले होते. चंद्रयान मोहिमेची संकल्पना सुचली त्यानुसार बेस्ट आगारातील टाकाऊ वस्तूंपासून हे रॉकेट तयार करण्यात आले. त्यासाठी सहकाऱ्यांची मदत केली. - अनिल तांबे, बेस्ट कर्मचारी