मुंबई : मुंबईसह राज्यभरातून थंडीने काढता पाय घेतला असून, आता कडक उन्हाने नागरिकांना चटके देण्यास सुरुवात केली आहे. यात पुढील दोन दिवस गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात कमाल तापमान ३७ ते ३९ अंशाच्या घरात राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांतही गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चढता आहे. विशेषत: सकाळी अकरा ते दुपारी ४ वाजेपर्यंत पडणारे ऊन मुंबईकरांना त्रासदायक ठरत असून, यात आता आणखी भर पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
येत्या चार दिवसांत उत्तर महाराष्ट्राच्या काही भागातून कोरडे आणि उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे संबंधित भागात तापमान वाढेल.- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग