मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. यात सरकारसह सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि तरुण-तरुणी सामील होत आहेत. विशेषत: कोरोनादरम्यानच्या उपचारांवेळी रक्त कमी पडू नये, रक्ताबाबत अडचण येऊ नये म्हणून ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. अशाच उत्तम उपक्रमांतर्गत डोंगरी येथील मराठा कला मंदिर (न्यू डोंगरी स्पोटर््स क्लब)ने शनिवारी सकाळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ९० टक्के दात्यांनी रक्तदान करत मुंबईकरांसमोर आदर्श घालून दिला आहे.दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने येथे महापूजेसह रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी मात्र लॉकडाउनमुळे महापूजा आयोजित करण्यात आली नाही. तर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासाठी बीआयटी चाळ क्रमांक ७ची तरुण मुले एकत्र आली.जे.जे. रक्तपेढीच्या मदतीने शनिवारी सकाळी इमारतीच्या आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डोंगरी पोलीस ठाण्याकडून यासाठी परवानगीदेखील घेण्यात आली. परिसरातील तरुण मुले, मुली यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला आणि या रक्तदान शिबिराद्वारे ९० दात्यांनी रक्तदान केले. यावेळी डोंगरी पोलीस ठाण्याचे एपीआय निकम उपस्थित होते, अशी माहिती खजिनदार अॅड. नीलेश शेळके यांनी दिली. दरम्यान, सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोंगरी हा परिसर ‘रेड झोन’ आहे. यावेळी सोशल डिस्टन्स पाळण्यात आला, असे मंडळाकडून सांगण्यात आले.
कोरोनाला हरवण्यासाठी मुंबईकरांचे रक्तदान अभियान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 1:48 AM