मुंबईकरांनो, पाणी उकळून प्या! ४ फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 11:35 PM2023-01-31T23:35:30+5:302023-01-31T23:35:44+5:30

ज्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता, ती सर्व कामे जल अभियंता खात्याच्या चमुद्वारे दिवसरात्र पद्धतीने व युद्ध पातळीवर अव्याहतपणे करण्यात आली

Mumbaikars, boil water and drink it! Water will be supplied at low pressure till February 4 - BMC | मुंबईकरांनो, पाणी उकळून प्या! ४ फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

मुंबईकरांनो, पाणी उकळून प्या! ४ फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

Next

मुंबई - मुंबईकरांना करण्यात येणारा दैनंदिन पाणीपुरवठा हा सुरळीतपणे व्हावा यासाठी महापालिकेकडून भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळपासून हाती घेण्यात आले होते. भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या जल वाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करण्यासह २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामेही हाती घेण्यात आली होती. ही सर्व कामे आता पूर्ण झाली असून ज्या १४ विभागातील पाणीपुरवठा प्रभावित झाला होता, त्या विभागांसह सर्व विभागांचा पाणीपुरवठा आता हळूहळू पूर्वपदावर येत असून सुरळीत होत आहे अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे आणि पाणीपुरवठा प्रकल्प खात्याद्वारे पाणीपुरवठा विषयक सुधारणांची तसेच परिरक्षणाची विविध कामे महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी हाती घेतली जातात. कामाच्या कालावधी दरम्यान नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल जल अभियंता खात्याद्वारे मुंबईकरांचे आभार मानण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आलं आहे.

महानगरपालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले की, दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांपैकी काही विभागातील पाणीपुरवठा बंद होता. या अंतर्गत पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम हे ९ विभाग; तर पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल हे ३ विभाग; यानुसार १२ विभागांचा यात समावेश होता. त्याचबरोबर 'जी उत्तर' आणि 'जी दक्षिण' या २ विभागातील काही परिसरांमध्ये २५ टक्के कपात लागू करण्यात आली होती.

ज्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता, ती सर्व कामे जल अभियंता खात्याच्या चमुद्वारे दिवसरात्र पद्धतीने व युद्ध पातळीवर अव्याहतपणे करण्यात आली. जल अभियंता खात्याद्वारे निर्धारित करण्यात आलेली संबंधित कामे आता पूर्ण झाली असल्याने पाणीपुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत असून सुरळीत होत आहे. तथापि, नवीन जलवाहिनीची जोडणी, झडपा बसविणे व उद्भवलेल्या गळतीची दुरुस्ती करणे व इतर काही तांत्रिक कामे नुकतीच करण्यात आलेली असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळून वापरावे असं सांगण्यात आले आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अधिक  सुरळीतपणे व चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी ही कामे हाती घेण्यात आली होती. सदर तांत्रिक व परिरक्षण विषयक कामे योग्यप्रकारे पूर्ण झाली असली, तरी देखील जल अभियांत्रिकीय दृष्टीकोनातून येत्या दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उपरोक्त १२ विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तरी कृपया पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याच्या कालावधी दरम्यान नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. 
 

Web Title: Mumbaikars, boil water and drink it! Water will be supplied at low pressure till February 4 - BMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.