मुंबईकरांनो आज किंवा उद्याच ‘बाप्पा’ला घरी आणा, महापालिका करणार विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 02:08 AM2020-08-18T02:08:52+5:302020-08-18T02:09:00+5:30
नागरिकांना आपल्या गणेशमूर्ती जमा कराव्यात, असे महापालिकेने परिपत्रकाद्वारे सोमवारी स्पष्ट केले.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी गणेश चतुर्थीच्या तीन-चार दिवसांआधीच भाविकांनी गणेशमूर्ती घरी आणावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच नैसर्गिक विसर्जन स्थळावरही नागरिकांना थेट विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आह़े अशा स्थळांवर मूर्ती संकलनाची व्यवस्था संबंधित विभाग कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे़ तेथेच नागरिकांना आपल्या गणेशमूर्ती जमा कराव्यात, असे महापालिकेने परिपत्रकाद्वारे सोमवारी स्पष्ट केले.
कोरोनामुळे यावर्षी गणेशोत्सवासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशमूर्तींची स्थापना १५ दिवस आधी करीत असतात. मात्र यंदा सार्वजनिक मंडळांमध्ये नेहमीचा उत्साह दिसून येत नाही, तसेच घरगुती गणेश उत्सव यावरही काही नियम लागू करण्यात आले आहेत.
त्यानुसार यावर्षी गणेशमूर्तीच्या आगमनाच्या वेळी रस्त्यांवरील गर्दी टाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे गणेशमूर्तीचे आगमन गणेश चतुर्थीच्या तीन-चार दिवस आधीपासूनच करण्याचे आवाहन विभाग कार्यालयाद्वारे व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात येणार आहे. तसेच यावर्षी कृत्रिम विसर्जन स्थळांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच पटीने वाढविण्यात आली आहे. तसेच फिरती गणेशमूर्ती संकलन केंद्रही विभाग स्तरावर सुरू करण्यात येणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळे, तसेच कृत्रिम स्थळे यांच्यापासून एक ते दोन किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी त्यांचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
>प्रत्येक विभागाच्या सहायक आयुक्तांनी आपल्या विभागामध्ये किमान सात ते आठ मूर्ती संकलन केंद्रे सुरू करावीत, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ही केंद्रे रिकामी मैदाने, काही सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप तसेच विभाग कार्यालय या ठिकाणी असतील. अशा संकलन केंद्रांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.
गणेशमूर्ती संकलन केंद्रात जमा कराव्यात. त्यानंतर महापालिकेमार्फत या सर्व मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात येईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.