मुंबईकर सोशल डिस्टन्स पाळून देऊ शकतात महापालिकेला बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 01:29 AM2020-06-06T01:29:17+5:302020-06-06T01:29:22+5:30
महापौर किशोरी पेडणेकर : सूचनांचे पालन होणे आवश्यक
शेफाली परब।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कधी न थांबणारे शहर अशी मुंबईची ख्याती. मात्र कोरोनारूपी संकटाने या जागतिक दर्जाच्या शहराला ब्रेक लावला. गेले अडीच महिने सर्व व्यवहार ठप्प असलेले हे शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सम -विषम पद्धतीने येथील दुकाने शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहेत. जनजीवन पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी हे पहिले पाऊल आहे. मात्र महापालिकेच्या या प्रयत्नांना मुंबईकरच बळ देऊ शकतात. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळून सहकार्य करा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
रुग्णसंख्या वाढत असताना दुकाने सुरू केल्याने परिस्थिती बिघडेल असे वाटत नाही का?
गेले अडीच महिने मुंबईतील सर्व व्यवहार ठप्प आहेत. काम बंद असल्याने अनेक कुटुंबांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. लोकांमध्ये आता अस्वस्थता पसरली असून याचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे कधीतरी लॉकडाऊनचे नियम शिथिल करावे लागणारच होते. दुकाने, मंडया सुरू करणे हा एक प्रयोग आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका सर्व प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर मुंबईकरांचे सहकार्य मिळाल्यास या संकटावर मात करणे शक्य होईल.
मिशन बिगिन अगेनमध्ये अस्पष्टता असल्याने गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये संभ्रम आहे. तो दूर कसा करणार?
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्व गृहनिर्माण सोसायट्यांनी आपल्या सुरक्षेसाठी पूर्ण खबरदारी घेतली. यापुढेही आपली जबाबदारी ओळखून रहिवाशांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरू करावे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडणे, सोसायटीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान तपासणे, बाहेर जाताना मास्क वापरणे, नियमित सॅनिटायझर वापरणे असे नियम पाळले तरी कोरोनाचा प्रसार टाळता येऊ शकतो.
मुंबईत लॉकडाऊन खुले करताना नियम पाळले जातील, याची खबरदारी महापालिका कशी घेणार?
दुकाने सुरू झाल्यानंतर त्यामध्ये सोशल डिस्टन्सचे नियम पाळले जात आहेत का, यावर लक्ष ठेवण्याचे काम पालिकेच्या संबंधित विभागांमार्फत करण्यात येईल. मात्र ही जबाबदारी जेवढी महापालिकेची आहे, तेवढीच दुकानदार, ग्राहक आणि मुंबईकरांचीही आहे. कोरोनाचा धोका, लॉकडाऊनचे परिणाम आपण पाहिले, त्यामुळे या आपत्तीला तोंड देण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवून सर्वांनी सहकार्य करावे. दुकानात गर्दी करू नये, मास्क वापरावा, कुठल्याही वस्तूला हात लावणे टाळावे, असे साधे नियम पाळूनही आपल्याला सुरक्षित राहता येईल.
गैरहजर राहणाºया कर्मचाऱ्यांवर थेट बडतर्फीची कठोर कारवाई का?
अत्यावश्यक यंत्रणेसाठी आपण काम करतो, याची जाणीव कर्मचाºयांना हवी. वारंवार सूचना करूनही कर्मचारी दांड्या मारत असतील, तर त्यांना घरीच बसवणे योग्य आहे. कंत्राटी कामगार कोणतेही कारण न देता कामावर येत आहेत. मग संकटकाळात कायम कामगारांनी तत्काळ कामावर रुजू होऊन ताकद वाढवणे अपेक्षित आहे. दांडीबहाद्दर कर्मचाºयांची गय केली जाणार नाही.