मुंबईकरांनो, काेरोनामुळे होळी, धूलिवंदन साजरी करता येणार नाही, पालिकेकडून मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 08:11 AM2021-03-24T08:11:50+5:302021-03-24T08:12:39+5:30
कोरोना बाधित रुग्णांचा आकडा मुंबईत झपाट्याने वाढू लागला आहे. दररोज ३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे
मुंबई : कोरोना बाधित रुग्णांचा आकडा मुंबईत वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यामुळे होलिकोत्सव आणि धूलिवंदन साजरा करण्यास महापालिकेने मनाई केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर साथरोग कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त इकबालसिंह यांनी दिला आहे. याबाबतचे परिपत्रक त्यांनी मंगळवारी काढले आहे.
कोरोना बाधित रुग्णांचा आकडा मुंबईत झपाट्याने वाढू लागला आहे. दररोज ३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमावर महापालिकेने निर्बंध आणले आहेत. २८ मार्च रोजी होळी आणि दुसऱ्या दिवशी धूलिवंदन असल्याने हा उत्सव मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उत्सवासाठी नागरिक एकत्र आल्यास कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका आहे.
परिणामी, खासगी व सार्वजनिक जागेत सार्वजनिकरित्या होळी व रंगपंचमी साजरा करू नये, अशी ताकीद महापालिकेने मुंबईकरांना दिली आहे. तसेच मी जबाबदार या मोहिमेची आठवण करून देत वैयक्तिकरित्यादेखील हा उत्सव साजरा करणे टाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. कोरोनाचा प्रसार मुंबईत रोखण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती प्रशासनाने मुंबईकरांना केली आहे.