Join us

मुंबईकरांनो! रुग्णवाढीचा धोका ओळखून काळजी घ्यायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 8:29 AM

CoronaVirus : गेल्या काही दिवसांत वाढलेला गारठा, हे यामागचे प्राथमिक कारण असावे. कोरोनाची साथ अद्याप पूर्णपणे संपलेली नाही, हेच यातून स्पष्ट होते; त्यामुळे योग्य ती काळजी घ्यायला हवी.

मुंबई : दिवाळीच्या सुमारास कोविडची दुसरी लाट रोखण्यात यश आले. लसीकरणाची मोहीमही सुरू झाली. कोरोनाबाबत काहीसा निर्धास्तपणा येत आहे. असे असतानाच रुग्णसंख्येचा खाली गेलेला आलेख वर जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर यंत्रणांसह सामान्य नागरिकांसाठी ही धोक्याची घंटा असून कोरोनाविषयी बेफिकीर होणे धोकादायक ठरेल, असा सल्ला राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.गेल्या काही दिवसांत वाढलेला गारठा, हे यामागचे प्राथमिक कारण असावे. कोरोनाची साथ अद्याप पूर्णपणे संपलेली नाही, हेच यातून स्पष्ट होते; त्यामुळे योग्य ती काळजी घ्यायला हवी. कोविड जणू संपलेलाच आहे, अशीच बहुतेकांची समजूत झाल्याचे त्यांच्या वावरण्यावरून वाटते. पहिल्या लाटेच्या वेळी कोरोनाबाबत निर्माण झालेल्या भीतीमुळे असेल किंवा पोलिसांकडून काटेकोर अंमलबजावणी होत असल्यामुळे असेल; कोविडबाबत लोक गांभीर्याने काळजी घेत होते. मास्क परिधान करीत आणि सुरक्षित वावराचे सर्व नियमही बऱ्यापैकी पाळत होते. या गोष्टींची आजही तितकीच गरज आहे, असे टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले. बाधितांची संख्या वेगाने वाढली, तरी त्वरित उपचार होईल, अशा सुविधा सज्ज ठेवायला हव्यात. पहिल्या लाटेच्या वेळी झालेल्या चुकाही दुरुस्त करायला हव्यात; लॉकडाऊनसारखे उपाय टाळायला हवेत. अलीकडच्या काळातील हे सर्वांत मोठे स्थलांतर होते. असा प्रकार पुन्हा होऊ द्यायचा नसेल, तर वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याला आणि सर्वांनी सुरक्षित वावराचे नियम पाळण्याला पर्याय नाही, कोविडबाबत लोक गांभीर्याने काळजी घेत नसल्याने यंत्रणांनी त्वरित कठोर पावले उचलायला हवीत, असे निरीक्षण मुंबई कोरोना टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी मांडले.

लसीकरणसंदर्भात लसीकरणसंदर्भात जनजागृती करण्यासाठीच्या बहुमाध्यमी प्रदर्शनकारी व्हॅनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ही गाडी मुंबईत तीन मार्गांवरून प्रवास करेल. वांद्रे-धारावी-जुहू-अंधेरी-बोरीवली, गोरेगाव-चिंचवली-मालाड-कांदिवली-चारकोप-बोरीवली-दहीसर, कुर्ला-चेंबूर-घाटकोपर-मानखुर्द-तुर्भे-भांडुप-विक्रोळी असे हे तीन मार्ग आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस