मुंबईकरांनी सावधपणे केले नववर्षाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:07 AM2021-01-02T04:07:19+5:302021-01-02T04:07:19+5:30
हॉटेल व्यावसायिकांना ५० टक्केच प्रतिसाद : आहार संघटनेची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी नववर्षाचे सावधपणे ...
हॉटेल व्यावसायिकांना ५० टक्केच प्रतिसाद : आहार संघटनेची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी नववर्षाचे सावधपणे स्वागत केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांनी ५० टक्के प्रतिसाद दिला, अशी माहिती ‘आहार’ने दिली.
याबाबत आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, कोरोनामुळे आठ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचा व्यवसाय गमावला. सरकारने जे नियम लावले आहेत, त्याचे पालन करत आहाेत. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात नेहमीच्या तुलनेत तिप्पट व्यवसाय होत असतो. मात्र, निर्बंध लावण्यात आल्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण मुंबईसोडून इतर ठिकाणी गेले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांचा ५० टक्के प्रतिसाद मिळाला.
नवीन वर्षाचे स्वागत करणाऱ्यांसाठी फूड डिलिव्हरी आणि टेकअवे सेवेसाठी १.३० पर्यंत परवानगी दिली होती. त्यामुळे फूड डिलिव्हरी आणि टेकअवेला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्राहक विकास जाधव म्हणाले की, आम्ही दरवर्षी हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशन करतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही घरी राहून नववर्षाचे स्वागत केले. फूड ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन जेवण मागविले.
ग्राहक शेखर शिंदे म्हणाले की, आम्ही दरवर्षी सहपरिवार हॉटेलमध्ये जाऊन नववर्षाचे स्वागत करतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळेची मर्यादा असल्याने आम्ही १० वाजता हॉटेलमध्ये जेवण केले आणि रात्री १२ वाजता घरी केक कापला.