मुंबईकरांनो, विद्युत जोडणी तपासा; उपकरणे, वायरिंगबद्दल सजग व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 04:24 AM2018-12-29T04:24:50+5:302018-12-29T04:25:02+5:30

चेंबूर येथील सरगम सोसायटीला गुरुवारी लागलेल्या आगीत पाच ज्येष्ठ नगारिकांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले.

Mumbaikars, check power connections; Be wary of equipment, wiring! | मुंबईकरांनो, विद्युत जोडणी तपासा; उपकरणे, वायरिंगबद्दल सजग व्हा!

मुंबईकरांनो, विद्युत जोडणी तपासा; उपकरणे, वायरिंगबद्दल सजग व्हा!

Next

- सचिन लुंगसे

मुंबई : चेंबूर येथील सरगम सोसायटीला गुरुवारी लागलेल्या आगीत पाच ज्येष्ठ नगारिकांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. या दुर्घटनेला ख्रिसमस ट्रीच्या साहित्याला झालेले शॉर्ट सर्किट कारणीभूत ठरले आणि नंतर उडालेल्या सिलिंडरच्या भडक्याने आग अधिकच पसरल्याने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. मुंबई शहर आणि उपनगरातील आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढच होत आहे. त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात घेता, मुंबई महापालिकेने विद्युत जोडणी, विद्युत उपकरणे, वायरिंग आदींबाबत अत्यंत सजगता बाळगणे आवश्यक असल्याचे सांगत अग्निसुरक्षेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आवाहन मुंबईकरांना केले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे, अयोग्य विद्युत जोडणीमुळे आग लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे लक्षात घेता विद्युत जोडणीची दाब क्षमता, विद्युत उपकरणे, विद्युत खटके (बटन/स्विच), वायरिंग याबाबत अत्यंत सजग असणे गरजेचे आहे. परिणामी, विद्युत उपकरणांनुसार किती क्षमतेचा विद्युत प्रवाह (वीजदाब) लागणार आहे? याची तपासणी करून त्यानुसार विद्युत वितरण कंपनीकडून जोडणी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

विद्युत खटके (बटन/स्विच), वायरिंग, वायरिंगचे आवरण, विद्युत उपकरणे हे वीज दाब क्षमतेला अनुरूप तसेच आयएसआय प्रमाणित असावेत. त्यांची जोडणी, फिटिंग इत्यादी कुशल व अधिकृत तंत्रज्ञांकडूनच करून घ्यावी. मीटर केबिनसह, ज्या ठिकाणाहून विद्युत जोडणी आपल्या जागेत येते, तेथे मेन स्विच तंत्रज्ञांच्या सल्ल्यानुसार बसवून घ्यावेत, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

उपकरणांची तपासणी करावी

नव्याने घेण्यात येणारे विद्युत उपकरण अधिक दाब क्षमतेचे असल्यास आपली विद्युत जोडणी तेवढ्या दाब क्षमतेची करून घेण्यासाठी कंपनीला कळवावे.
अन्न शिजविले जाते किंवा पदार्थ तयार केले जातात, त्या खोलीत गॅस, लाकूड इत्यादी इंधन प्रकारानुसार तापमान कमी-जास्त असू शकते. हे पाहता तेथील वायरिंग, विद्युत खटके, विद्युत उपकरणांची तपासणी नियमित करावी.
गॅसगळती होत असल्यास शटआॅफ व्हॉल्व/रेग्युलेटर बंद करावे.
दरवाजे-खिडक्या तातडीने उघडाव्यात. विद्युत उपकरण वा बटन बंद अथवा सुरू करू नये.
तेलाचे दिवे, मेणबत्ती, उदबत्तीसारखे आगीचे इतर स्रोत बाजूला विझवावेत.
दारे-खिडक्या तातडीने उघडून खेळती हवा वाढेल व गॅस बाहेर निघून जाईल असे बघावे.
गळती होत असलेला सिलिंडर मोकळ्या जागेत किंवा मैदानात नेऊन ठेवावा.
गॅसगळती झाली असेल तेथून बाहेर पडून सुरक्षित जागी जावे.

सिलिंडरचा वापर काळजीपूर्वक करा
१४.२ किलो, १९.२ किलो व ४५ किलो अशा तीन प्रकारांत एलपीजी सिलिंडर येतात. सिलिंडरचा साठा व वापर काळजीपूर्वक करा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
सिलिंडर अधिकृत गॅस वितरकाकडून व अधिकृतपणेच खरेदी करावा.
सिलिंडर घेताना लिकेज नसल्याची खातरजमा करावी.
लिकेज असल्याचे लक्षात आल्यास लगेच सिलिंडर बदलून घ्यावा.
सिलिंडर बंदिस्त जागी ठेवू नये.
सिलिंडर आडवा ठेवल्यास लिकेज होण्याची शक्यता असते.
सिलिंडर कोणत्याही परिस्थितीत आडवा ठेवू नये.
सिलिंडर नेहमी उभाच ठेवावा.
सिलिंडरचा साठा करताना त्याची सेफ्टी कॅप लावलेली असावी.
सिलिंडरजवळ ज्वालाग्राही पदार्थ ठेवू नयेत.
सिलिंडर, रेग्युलेटर, पाइप, गॅस शेगडी यांची जोडणी करताना अधिकृत व्यक्तीकडूनच करून घ्यावी.
गॅसचा पाइप रबराचा असल्यास तो २ मीटरपेक्षा अधिक लांबीचा नसेल याची काळजी घ्यावी.

Web Title: Mumbaikars, check power connections; Be wary of equipment, wiring!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.